वन्य जीव मंडळाची शिफारस : स्थलांतर सक्तीने नको, तर स्वेच्छेने करावे

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : केंद्रीय तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार राज्यात व्याघ्र प्रकल्प (टायगर रिझर्व्ह) झाल्यास पहिल्या टप्प्यात नेत्रावळी आणि खोतीगाव या भागांवर स्वेच्छा स्थलांतराचे संकट येऊ शकते. मात्र, स्थलांतर सक्तीने न करता स्वेच्छेनेच करावे, अशी स्पष्ट शिफारस वन्यजीव मंडळाने केली आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) म्हादई परिसर व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याची शिफारस केली आहे. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान तज्ज्ञ समिती नेमण्यात आली. समितीने २९६.७० चौ. किमी मुख्य क्षेत्र आणि १७१.९० चौ. किमी बफर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. पहिल्या टप्प्यात नेत्रावळी अभयारण्य (२११.०५ चौ. किमी) आणि खोतीगाव अभयारण्य (८५.६५ चौ. किमी) या भागांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन भागांतील काही गावांवर स्वेच्छा स्थलांतराचे संकट येऊ शकते.
न्यायालयात प्रकरण प्रलंबित
मुंबई उच्च न्यायालयाने म्हादई व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्याचे निर्देश दिल्यानंतर गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सध्या हा विषय न्यायप्रविष्ट असून तज्ज्ञ समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.
सक्तीऐवजी स्वेच्छा स्थलांतर
व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील गावांचे स्थलांतर सक्तीने न करता स्वेच्छेने करावे, अशी शिफारस वन्यजीव मंडळाने केली आहे. देशातील व्याघ्र प्रकल्पांमधील २९८ गावे स्थलांतरित झाली असून ७३० गावांचे स्थलांतर बाकी आहे. तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांत अनेक ठिकाणी आदिवासी वस्ती असतानाही वाघांचे संरक्षण यशस्वी झाले आहे. यावरून लोकवस्ती असूनही वाघांचे संरक्षण होऊ शकते, हे स्पष्ट होते, असे निरीक्षण वन्य जीव मंडळाच्या बैठकीत नोंदवण्यात आले आहे.
पर्यावरणवाद्यांचे मत
पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी व्याघ्र प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला आहे. व्याघ्र क्षेत्रात प्रदूषणकारी व मोठे विकास प्रकल्प टाळले पाहिजेत. स्वेच्छेने स्थलांतर झाल्यास पर्यावरण संरक्षणाला मदत होईल, असे मत केरकर यांनी व्यक्त केले आहे.