राज्यातील सहापैकी पाच धरणांत गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा

जलस्रोत खात्यातील अधिकाऱ्यांची माहिती : सध्याचा पाणीसाठा जूनच्या मध्यापर्यंत पुरेसा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd May, 09:48 pm
राज्यातील सहापैकी पाच धरणांत गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा

पणजी : राज्यात गतवर्षीच्या २२ मे च्या तुलनेत यंदा सहापैकी पाच धरणांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक आहे. असे असले तरी, सध्याचा पाणीसाठा जूनच्या मध्यापर्यंत पुरेल इतका असून आवश्यकता भासल्यास विविध उपाययोजना करून तो अधिक काळ वापरता येणे शक्य आहे, अशी माहिती जलस्रोत खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

धरणांतील पाणीसाठ्यात घट

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्याची तहान भागवणाऱ्या साळावली धरणात २२ मे २०२५ मध्ये ४४.६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता; तर २२ मे २०२६ अखेरीस या धरणात ३२.१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अंजुणे धरणात मागील वर्षी २६.९ टक्के पाणीसाठा होता, तर यावर्षी १६.९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

गतवर्षी गावणे धरणात ४९.४ टक्के तर यावर्षी ४४.९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पंचवाडीत गतवर्षी ३८.४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता, तो यावर्षी २६.९ टक्क्यांवर आला आहे. तसेच, चापोली धरणातही गतवर्षीच्या ५१.२ टक्क्यांच्या तुलनेत यंदा ४२.४ टक्के पाणीसाठा राहिला आहे.

📊 २२ मे : दोन वर्षांतील पाणीसाठा तुलना
साळावली (44.6 → 32.1)
अंजुणे (26.9 → 16.9)
चापोली (51.2 → 42.4)
गावणे (49.4 → 44.9)
पंचवाडी (38.4 → 26.9)
आमठाणे (41.5 → 55)
5
धरणांत घट
1
धरणात वाढ
जून
मध्यापर्यंत पुरेसा साठा
आमठाणे, तिळारीतील स्थिती

सध्या राज्यातील सहापैकी आमठाणे धरणात सर्वाधिक पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी २२ मे रोजी आमठाणेत ४१.५ टक्के इतका पाणीसाठा होता; तर यंदा २२ मे अखेरीस त्यात ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

उत्तर गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तिळारी धरणाची क्षमता ४६ हजार २१७ हेक्टर मीटर असून, २२ मे २०२६ अखेरीस यामध्ये १६ हजार २७४ हेक्टर मीटर (३५.२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी २२ मे रोजी तिळारीमध्ये ४३.६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.

🌧️ मान्सूनच्या लवकर आगमनाची शक्यता

केरळमध्ये साधारणपणे १ जून दरम्यान मान्सूनचे आगमन होते. यंदा ते ६ दिवस आधी म्हणजे २६ मे पर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनुकूल वातावरण राहिल्यास गोव्यातही मान्सून लवकर दाखल होऊ शकतो. त्यामुळे धरणांमधील रिक्त पाणीसाठा भरून निघण्यास मदत होऊ शकते.

#GoaNews #WaterStorage #GoaDam #Monsoon #WaterLevel #GoaWeather #Salaulim #Tilari
हेही वाचा