
राजधानी पणजीमधील वातावरण चांगलेच तापले आहे. येथील मांडवी नदीत जुने कॅसिनो जहाज हटवून त्याऐवजी नवीन कॅसिनो जहाज आणण्यात येणार आहे. जुन्यापेक्षा नवीन जहाजाची क्षमता अधिक आहे.
११२ मीटर लांब आणि ३० मीटर उंच असणाऱ्या या जहाजामुळे राजधानीतील समस्या, नदीतील प्रदूषण वाढणार असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. याबाबत पणजी महापालिका, बंदर कप्तान खात्याला निवेदन देण्यात आले आहे. याविषयी झालेल्या सभेत केवळ पणजी नव्हे, तर संपूर्ण गोव्यातून कॅसिनो हटवण्याची मागणी करण्यात आली. अर्थात या मोहिमेला पणजीकरांकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. या मोहिमेत ठराविक वर्गातीलच लोक दिसून येत आहेत.
सध्या पणजी महानगरपालिका निवडणूक असल्याने कॅसिनोंचा मुद्दा चांगलाच उचलून धरता आला असता. याआधी महापौरांनी आपल्याला वैयक्तिक पातळीवर कॅसिनो आवडत नसल्याचे सांगितले. मात्र, त्याचवेळी कॅसिनो हटविल्यास यामुळे निर्माण झालेल्या अर्थव्यवस्थेला पर्याय द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र काही दिवस जोरदार चाललेला हा मुद्दा आता थंडावला आहे. स्मार्ट सिटी कामामुळे सुमारे तीन वर्षे सहन करावा लागलेला त्रास असो, वारंवार होणारी वाहतूक कोंडी, पे पार्किंग, पार्किंगला जागा नसणे किंवा व्यावसायिक आणि रहिवासी इमारती एकत्र असल्याने होणारे त्रास असो, पणजीकर रस्त्यावर येऊन विरोध करताना दिसत नाहीत. एकूणच पणजीकर कमालीचे सोशिक होत आहेत, असेच म्हणावे लागेल.
पणजी १८३ वर्षे जुने शहर आहे. जुना वारसा जपताना विकास करण्यास हरकत नसावी. प्रत्येक नव्या गोष्टींना विरोध करणे योग्य नाही. मात्र नव्या गोष्टी सुरू करताना स्थानिकांचा अभिप्राय नक्कीच घेता येईल.
पणजीच्या अनेक ओळखीपैकी राज्याची राजधानी ही एक महत्त्वाची ओळख आहे. असे असले तरी येथील सध्याची परिस्थिती पाहता हे खरोखरच राजधानीचे शहर आहे का, असा प्रश्न पडतो. केवळ प्रशासकीय मुख्यालये आहेत म्हणून पणजीला राजधानी म्हणायचे का? बरे तसे असले तर याआधीच अनेक प्रशासकीय कार्यालये पणजीच्या बाहेर हलवण्यात आली आहेत. प्रशासन स्तंभ आल्यावर कदाचित उर्वरित कार्यालये देखील पणजीबाहेर जातील. त्यानंतर पणजीची ओळख केवळ कॅसिनो, जुगाराची राजधानी किंवा महापालिकेच्या नावाखाली सुरू असलेली एक मोठी नगरपालिका म्हणून राहू नये, हीच अपेक्षा.
- पिनाक कल्लोळी