
पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबचा मालक सौरभ लुथरा याच्यावर कोलवाळ तुरुंगात हल्ला करण्यात आला, अशी चुकीची बातमी प्रसारित केल्या प्रकरणात कोलवाळ पोलिसांनी दोन चॅनल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी सदर चॅनलना नोटीस जारी केली आहे.
कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तुरुंग अधीक्षक सुचेता देसाई यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन क्लबला शनिवार, ६ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री भीषण आग लागली होती. त्या दुर्घटनेत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी क्लबचा मालक सौरभ लुथरा याला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी ठोठावली. त्यामुळे सौरभ लुथराची कोलवाळ तुरुंगात रवानगी केली. दरम्यान, ७ रोजी त्याला नियमित वैद्यकीय चाचणीसाठी म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात आणले होते. याच दरम्यान दोन चॅनलनी कोलवाळ येथील मध्यवर्ती तुरुंगात सहकारी कैद्यांनी सौरभ लुथरावर हल्ला केल्याचा दावा केला. त्यामुळे लुथराला वैद्यकीय तपासणीसाठी उत्तर जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तसेच तेथील डॉक्टरांनी लुथराची तपासणी केली आणि त्याला गुडघा व बरगड्यांचे एक्स-रे काढण्यास सांगितल्याची चुकीची बातमी प्रसारित केल्याचे तक्रारीत नमूद केले. या बातमीमुळे कोलवाळ तुरुंगाची बदनामी केल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला. याची दखल घेऊन कोलवाळ पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र सातेलकर यांनी संबंधित दोन्ही चॅनल विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन्ही चॅनलना नोटीस जारी केली आहे.