
वाळपई : विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून एकाची ३.४५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गोव्यातील (Goa) वाळपई पोलिसांनी (Valpoi Police) एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विदेशात नोकरी (Job) देण्याच्या बहाण्याने पैसे घेतले व नंतर नोकरी दिली नाही व पैसेही दिले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
शुक्रवारी रात्री उशीरा वरील तक्रार दाखल झाल्यानंतर वाळपई पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. विदेशात नोकरी उपलब्ध असल्याचे सांगून एकूण प्रक्रिया करण्यासाठी आगाऊ पैसे मागण्यात आले. नोकरी मिळणार असल्याच्या आशेने संशयिताने सांगितलेल्या वेगवेगळ्या बॅंक खात्यात अनेक वेळा मिळून सुमारे ३.४५ लाख रुपये जमा करण्यात आले. मात्र, पैसे जमा केल्यानंतर नोकरी मिळत नसल्याचे पाहून व पैसेही परत केले जात नसल्याने शेवटी वाळपई पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, बॅंक खात्यांची पडताळणी व एकूण सविस्तर माहिती घेतली जात आहे. दरम्यान, विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारे रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोधही पोलीस घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.