कृती समितीचा इशारा : सरकारला २७ जानेवारीपर्यंत मुदत

तुये हॉस्पिटल कृती समितीच्या पत्रकार परिषदेत बोलताना जुझे लोबो. सोबत अॅड. प्रसाद शहापूरकर अॅड. जितेंद्र गावकर, व्यंकटेश नाईक, देवेंद्र प्रभुदेसाई व इतर. (निवृत्ती शिरोडकर)
पेडणे : तुये येथील नव्या हॉस्पिटल इमारतीमध्ये अत्याधुनिक सुविधांऐवजी केवळ सध्याच्या सामुदायिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर करण्याचा घाट सरकारने घातल्यास तो हाणून पाडला जाईल. असा प्रयत्न झाल्यास तुये हॉस्पिटल कृती समितीतर्फे २८ पासून आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा समितीने पत्रकार परिषदेत दिला आहे.
यावेेळी लोबो आणि अॅड. शहापूरकर यांनी सांगितले की, २०१७ मध्ये इमारत पूर्ण होऊनही जीएमसी लिंक हॉस्पिटल सुरू झालेले नाही. अलीकडेच विधानसभेत आरोग्यमंत्र्यांनी ३० जानेवारी रोजी उद्घाटनाचे संकेत दिले आहेत. मात्र, नव्या उपकरणांच्या निविदा आणि कर्मचारी भरतीसाठी किमान ४-५ महिने लागणार असताना १० दिवसांत हॉस्पिटल सुरू करणे अशक्य आहे. त्यामुळे केवळ घाईगडबडीत जुन्या केंद्राचे स्थलांतर करून पेडणेकरांच्या डोळ्यांत धूळ फेकू नये, अशी मागणी समितीने केली आहे.
पार्से येथील प्रभुदेसाई फाउंडेशनच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेस तुये हॉस्पिटल कृती समितीचे निमंत्रक जुझे लोबो, समन्वय समितीचे सदस्य अॅड. प्रसाद शहापूरकर, देवेंद्र प्रभुदेसाई, व्यंकटेश नाईक, तुळशीदास राऊत, भास्कर नारुलकर, अॅड. जितेंद्र गावकर, नीलेश कांदोळकर, सत्यवान वराडकर आदी उपस्थित होते.
नव्या इमारतीत गायनॅकॉलॉजी, पेडियाट्रिक आणि कार्डिओलॉजी यांसारखे स्पेशल वॉर्ड सुरू व्हावेत, असा आग्रह समितीने धरला आहे. आम्ही अत्याधुनिक हॉस्पिटलसाठी आणखी काही काळ वाट पाहण्यास तयार आहोत, पण केवळ जुने केंद्र नव्या इमारतीत नको, असे समितीने स्पष्ट केले. या संदर्भात २५ जानेवारीपर्यंत सरकारकडून लेखी आश्वासन न मिळाल्यास आमरण उपोषणासह राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सरकारला चर्चेचे आवाहन
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सरकारने कृती समितीला विश्वासात घेऊन चर्चा करावी. अत्याधुनिक सोयीसुविधा आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध केल्याशिवाय उद्घाटन करू नये. जर सरकारने अट्टहास धरला, तर होणाऱ्या परिणामांना सरकारच जबाबदार राहील, असे देवेंद्र प्रभुदेसाई व इतर सदस्यांनी यावेळी नमूद केले.