‘हिरवं’ सोनं... शंभर रुपयांना शेवग्याच्या चार शेंगा

पणजीत इतर भाज्यांचे दर स्थिर : टोमॅटो ६० रुपये किलाे, लसणाचे दरही ४०० रुपयांवर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th January, 11:59 pm
‘हिरवं’ सोनं... शंभर रुपयांना शेवग्याच्या चार शेंगा

पणजी : पणजी बाजारात शेवग्याला सोन्याचे दर आले आहेत. शंभर रुपयाला चार शेवग्याचे नग या दराने बाजारात विकले जात आहेत. दरम्यान, इतर भाज्यांचे दर मात्र स्थिर होते. मात्र, लसणाने अद्याप आपला भाव कमी केलेला नाही.
गेल्या दोन महिन्यांपासून बाजारातून गायब असलेल्या शेवग्याची आवक पुन्हा सुरू झाली असली, तरी त्याचे दर मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. पणजी बाजारात शेवग्याची एक जुडी ५०० रु. या दराने विकली जात आहे. तर चांगल्या दर्जाच्या शेवग्याची जुडी चक्क १ हजार रुपयाच्या घरात पोहोचली असून, किरकोळ बाजारात १०० रुपयांना केवळ ४ नग शेवगा विकला जात आहे. ‘सुपर फूड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेवग्याला थंडीच्या दिवसांत जास्त मागणी आली आहे.
सोमवारी बाजारात टोमॅटोचे दर ६० रुपये किलो, तर कांदे आणि बटाट्याचे दर दर्जानुसार ५०-४० रुपये किलो होते. ढब्बू मिरचीचे दर १२० रु. किलो, वालपापडी १०० रु. किलो, लहान वांगी ६० रु. किलो, मोठी वांगी ५० रु. एक नग, काकडी ६० रु. किलो होती. आल्याचे दर २०० रु. किलो, तर लसूण ४०० रु. किलो होता. दुधी भोपळ्याची एक शीर ५० रु. नग, तर एक दुधी ४० रु. नग होता. बाजारात काही व्यापाऱ्यांकडे मटार उपलब्ध असून त्याची किंमत दर्जानुसार ८० ते १०० रु. किलो आहे.
इतर पालेभाज्या, फळभाज्या

पालेभाज्यांमध्ये मेथी ३० रु. जुडी, कोथिंबीर २० ते ३० रु. जुडी, तर पालक ५० रुपयांना ५ जुड्या या दराने उपलब्ध आहे. फळभाज्यांमध्ये वालपापडी ८०-१०० रु., गवार ८०-१०० रु. आणि गाजर ६०-८० रुपये किलोने विकले जात आहे. कोबी ४० रुपये किलो, तर फ्लॉवर ५०-४० रुपयांना एक नग या दराने मिळत आहे. नारळाचे दर स्थिर असून ते आकारानुसार २० ते ५० रुपयांपर्यंत प्रति नग उपलब्ध आहेत. लिंबू ५० रुपयांना १५ नग या दराने विकले जात आहेत.

हेही वाचा