तिसरी, चौथीची परीक्षा ६ एप्रिलपासून होणार सुरू

एससीईआरटीकडून दुसऱ्या सामायिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th January, 11:09 pm
तिसरी, चौथीची परीक्षा ६ एप्रिलपासून होणार सुरू

पणजी : गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाने (SCERT) इयत्ता तिसरी ते आठवीच्या दुसऱ्या सामायिक परीक्षेचे वेळापत्रक (Schedules of Occasional Examinations) जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, इ. पाचवी ते आठवीची परीक्षा ५ मार्चपासून सुरू होईल, तर तिसरी आणि चौथीची परीक्षा ६ एप्रिलपासून घेतली जाणार आहे.

५ वी ते ८ वीची परीक्षा ५ मार्चपासून

पाचवी ते आठवीची परीक्षा ५ मार्च ते १२ मार्च २०२६ या कालावधीत चालेल. परीक्षेची वेळ सकाळी ८.३० वाजता असेल. ५ मार्च रोजी सातवीचा पहिला पेपर गणित, तर आठवीचा इंग्रजीचा पेपर असेल. ६ मार्च रोजी सहावीचा पहिला पेपर सुरू होईल. तर ७ मार्च रोजी पाचवीचा पहिला पेपर होईल. या सर्व वर्गांची परीक्षा १२ मार्च रोजी संपणार आहेत. ‍प्राथमिक विभागातील तिसरी आणि चौथीची परीक्षा ६ ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत घेतली जाईल. या परीक्षांसाठीही सकाळी ८.३० ची वेळ निश्चित करण्यात आली आहे.

पहिल्या सामायिक परीक्षेप्रमाणेच दुसऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका देखील ‘एससीईआरटी’ कडूनच तयार केल्या जाणार आहेत. २३ फेब्रुवारीपासून या प्रश्नपत्रिकांचे वाटप सुरू होईल. जर २८ फेब्रुवारीपर्यंत प्रश्नपत्रिका मिळाल्या नाहीत, तर मुख्याध्यापकांनी स्वतः एससीईआरटीच्या अधिकाऱ्यांची भेट घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
परीक्षा नियमांचे कडक पालन
परीक्षा सुरळीत पार पाडण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर असेल. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांचे पाकीट उघडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी परीक्षा नियंत्रकाची स्वाक्षरी झाल्यानंतरच प्रश्नपत्रिकांचे सीलबंद लिफाफे उघडता येतील. एससीईआरटीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परीक्षा घेणे सर्व शाळांना बंधनकारक आहे.

हेही वाचा