दिल्लीहून परतल्यानंतर मुख्यमंत्री तोडगा काढण्याची शक्यता

पणजी : कदंब पठारावरील प्रस्तावित ‘युनिटी मॉल’ (Unity Mall) प्रकल्पावरून चिंबल ग्रामस्थांनी (Chimbal villagers) पुकारलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळामध्ये बुधवारी चर्चा होणार आहे. ही बैठक आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी ११.३० वाजता निश्चित करण्यात आली असल्याची माहिती जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी दिली.युनिटी मॉलच्या निषेधार्थ चिंबल ग्रामस्थांनी २८ डिसेंबरपासून पुकारलेले आंदोलन सोमवारी २३ व्या दिवशीही सुरूच होते. या आंदोलनाला विरोधी पक्षांच्या नेत्यांसह अनेक पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनातही विरोधी आमदारांनी या प्रकल्पावरून गदारोळ केला होता. गुरुवारी आंदोलकांनी भव्य मोर्चा काढून मेरशी जंक्शन येथे रास्ता रोको केल्याने तणाव निर्माण झाला होता.
गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी स्वतः आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली होती. युनिटी मॉल हा केंद्र सरकारचा प्रकल्प असल्याने राज्य सरकार थेट निर्णय घेऊ शकत नाही, त्यासाठी केंद्राची मान्यता आवश्यक असल्याचे त्यांनी आंदोलकांना स्पष्ट केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर ग्रामस्थांनी महामार्गावरून हटून पुन्हा आपले आंदोलन कदंब पठारावर सुरू ठेवले आहे.
बुधवारच्या बैठकीकडे लक्ष
मुख्यमंत्री सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, तिथून परतल्यानंतर बुधवारी ते आंदोलकांशी सविस्तर चर्चा करणार आहेत. या बैठकीत ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन होते की आंदोलन अधिक तीव्र होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. चिंबल ग्रामस्थांनी मात्र आपला पवित्रा कायम ठेवत प्रकल्प रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे.