नगरपालिका निवडणुका वेळेवरच; पाणीपुरवठा आणि कोळशाच्या मुद्द्यावरून सभागृहात रणकंदन

पणजी: गोव्याच्या ८ व्या विधानसभेचे पाच दिवसीय हिवाळी अधिवेशन सोमवारपासून वादळी वातावरणात सुरू झाले असून, आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. १२ जानेवारी ते १६ जानेवारी या कालावधीत चालणाऱ्या या सत्रात २०२७ च्या आगामी विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटताना दिसत आहेत. रोज सकाळी ११:३० वाजता कामकाजाला सुरुवात होणार असून, सत्ताधारी भाजप आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले आहेत.
१२.५१ : नगरपालिका निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आगामी नगरपालिका निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती दिली. मार्च २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या सर्व नगरपालिकांच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत लांबणीवर टाकल्या जाणार नाहीत. या निवडणुका वेळेवर आणि पूर्णतः पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.
१२.३३ : कोळसा हाताळणीवरून विरोधकांचा 'हौदा'त गदारोळ
सभागृहात कोळसा हाताळणीचा मुद्दा उपस्थित होताच राजकीय वातावरण तापले. राज्यातील कोळसा हाताळणी पूर्णपणे बंद करण्यात यावी, अशी मागणी करत विरोधी पक्षाचे आमदार सभापतींच्या समोरील 'हौदा'त उतरले. जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले.

१२.१७ : पाणीटंचाई दूर होणार; नवीन प्रकल्प सहा महिन्यांत
पूर्ण पाणीपुरवठा मंत्री सुभाष फळदेसाई यांनी राज्याच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची आकडेवारी सादर केली. गोव्याची सध्याची गरज ७०० एमएलडी असून त्यापैकी ६३० एमएलडी पुरवठा केला जात आहे. उर्वरित तूट भरून काढण्यासाठी ३२५ एमएलडी क्षमतेचे नवीन प्रकल्प पुढील सहा महिन्यांत पूर्ण होतील, ज्यामुळे गोमंतकीयांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
१२.०० : - 'बर्च' आगीच्या मुद्द्यावर सरकारची हमी
'बर्च बाय रोमियो लेन' क्लबमधील आगीच्या प्रकरणावरून विरोधक आजही आक्रमक पाहायला मिळाले. या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप केला आणि या संपूर्ण आगीच्या घटनेवर शुक्रवारी सरकारतर्फे सविस्तर स्पष्टीकरण दिले जाईल, अशी ग्वाही सभागृहाला दिली.
११.५५ : प्रशिक्षकांना पावसाळ्यात रिकामे बसू देणार नाही
अधिवेशनाच्या सुरुवातीलाच क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांनी प्रशिक्षकांच्या कार्यक्षमतेवर मोठे विधान केले. राज्यात १.५ लाख रुपये पगार घेणारे ११० हून अधिक प्रशिक्षक पावसाळ्यात मैदानी खेळ बंद असल्याने सक्रिय नसतात. आता या प्रशिक्षकांचा ३६५ दिवस वापर करण्यासाठी 'इनडोअर स्टेडियम' आणि 'स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर्स'चा नवा प्लॅन सरकारने तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले.
बर्च दुर्घटनेच्या मुद्द्यावरून विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सभागृहात जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. हा विषय न्यायप्रविष्ट (Sub-judice) असल्याचे कारण पुढे करत सरकारने उत्तर देण्याचे टाळल्याने विरोधक आक्रमक झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विरोधी आमदारांमध्ये यावेळी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. अखेर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री सावंत यांनी येत्या शुक्रवारी या विषयावर विशेष चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे.
११.३६ : तारांकित प्रश्न आणि मंत्रिमंडळ बैठकीच्या अतारांकित प्रश्नावर सरकारने उत्तर न दिल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. यामागील नेमके 'गुपीत' काय, असा सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सभागृहात उपस्थित केला.
१०.१२ : मी आता शांत झालोय, देवाने मला तसा निरोप दिलाय, अशा शब्दांत मंत्री विश्वजीत राणे यांनी दिगंबर कामत यांच्या विधानाचा संदर्भ देत विरोधकांना मिश्किल टोला लगावला. काल पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांचा पारा चढला होता. विरोधकांनी केलेल्या सर्वच आरोपांना उत्तर देण्यास बांधील नाही असे ते म्हणाले होते.
११.१० : ‘वंदे मातरम्’चा आदर आहेच, पण सरकार म्हादई, बर्च दुर्घटना, जमीन रूपांतरण आणि भ्रष्टाचारासारख्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा का टाळते? असा सडेतोड सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.
११.०१ : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान केलेल्या गदारोळाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. या वर्तनावर सभापती डॉ. गणेश गावकर यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले असून, विरोधकांचे वागणे 'बेशिस्त आणि अशोभनीय' असल्याची टीका त्यांनी केली आहे. संसदेच्या शिस्तीचे पालन करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी आमदारांनी राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान केलेल्या गदारोळावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांना त्यांचे घटनात्मक कर्तव्य पार पाडू देणे आवश्यक आहे, त्यात व्यत्यय आणणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. पहिल्या दिवशीच्या राड्यानंतर आज सभागृहात कोणते नवे मुद्दे गाजतात, याकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागले आहे.