समोरील वाहनांच्या हाय बीम मुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा चालकाचा दावा.

पणजी: पणजीत दिवजा सर्कलजवळ मध्यरात्री एका आलिशान कारमुळे भीषण अपघात घडला. तमिळनाडू नोंदणीकृत असलेल्या या भरधाव कारने एका दुचाकीसह पर्यटकांच्या टॅक्सीला आणि इतर उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेसह दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिवजा सर्कल ते हिरा पेट्रोल पंप या दरम्यान हा अपघात झाला. धडक इतकी जबरदस्त होती की, काही चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. धडकेच्या वेगाने आलिशान कारचे एक चाक निखळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेले, यावरून कारचा वेग किती असावा याचा अंदाज येतो. या धडकेत एका दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशझोतामुळे (High-beam) डोळे दिपले आणि कारवरील नियंत्रण सुटले, असा दावा संबंधित चालकाने केला आहे. मात्र, पोलिसांनी हा दावा गांभीर्याने घेतला असून, चालकाने मद्यप्राशन केले होते का, हे तपासण्यासाठी त्याची 'अल्कोमीटर' चाचणी केली जाणार असल्याचे सांगितले. या अपघातामुळे मध्यरात्री पणजीतील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.