गोव्याच्या सत्तरी तालुक्यातील खोडये गावातील लोकसंस्कृती आणि जैवविविधतेचा वारसा जपणारी 'देवचाराचे लग्न' ही अनोखी व श्रद्धापूर्ण परंपरा.

ते दोघेही भाऊ घनदाट जंगलातून चालले होते. सभोवताली पसरलेले किर्र रान, जंगली श्वापदांचा वावर, अनेक खाचखळगे पायाखाली तुडवत ते चालले होते. धाकट्याच्या माथ्यावर शिवलिंग होते. त्या दोघांनाही खोडयेला जायचे होते. वाटेत सुरंगीचा मळ लागतो. धाकटा भाऊ मोठ्या भावाला म्हणतो, "तू चल पुढे, मी येथेच शौचास जाऊन येतो." असे म्हणून तो डोक्यावरील शिवलिंग खाली उतरवून ठेवतो आणि आडोशाला जातो. मोठा भाऊ झपाझप पावले टाकीत खोडयेच्या दिशेने रवाना होतो. इकडे छोटा भाऊ येतो, खाली ठेवलेले शिवलिंग उचलून घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते त्या जागी घट्ट झालेले असते. ते तेथेच कायमस्वरूपी स्थिरावते. मोठा भाऊ खोडये गावाच्या दिशेने जाऊन तेथील गाव वसवतो. गावाचे रक्षण करण्यासाठी कराडेश्वर व खरगाळकर हे दोघेही देवचार दक्ष राहायचे. येथील लोकमनाची त्यांच्यावर अपार श्रद्धा आजही आहे. ज्या ठिकाणी त्यांचा अधिवास आहे, तेथे सभोवताली मोठी जंगली झाडे वाढलेली आहेत. भरदिवसा निबिड काळोख असतो. भेरली माड दाटीवाटीने उभे असलेले दिसतात. याच गर्द वनराईत त्यांचे अस्तित्व लोकांना आश्वासक वाटते.
दैनंदिन जीवनात शेतीभाती करताना, जळणासाठी लाकूडफाटा आणताना, जंगली श्वापदांची त्यांना भीती वाटायची. त्यांनी आपला मार्ग अडवू नये, हल्ला करू नये, शेतीची नासधूस करू नये आणि मुलालेकरांचे रक्षण करावे, या भावनेने लोकमन त्यांना मोठ्या श्रद्धेने नारळ अर्पण करू लागले. सत्तरी तालुक्यातील खोडये गावात घोडगाची झाडे जेथे सभोवताली दिसतात, तोच कड्ड्तला देवाचा अधिवास. या परिसरात पट्टेरी वाघाचा संचार सर्वत्र होत होता. गुरेढोरे रानावनात फिरायची, पोरेबाळे मैदानावर खेळायची, मोठी माणसे डोंगरावर कुमेरीला जायची, नदीकाठी पुरण शेती करायची. या सर्वांचे रक्षण कड्ड्तला देव करतो, अशी लोकमनाची अढळ श्रद्धा. त्याला संतुष्ट करण्यासाठी नारळ अर्पण करणे, त्याचा उत्सव उत्साहाने साजरा करून मनाला आनंद देणे, यात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना मनस्वी आनंद वाटायचा. त्याचे स्मरण मनोमन करूनच ते आपली रोजची कामे करीत असत.
देवचाराला खुश ठेवण्यासाठी देवचाराचे लग्न लावण्याची परंपरा न जाणो गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू झालेली आहे. पौष महिन्यातील एखादा बुधवार किंवा गुरुवार हेरून हे लग्न केले जाते. यावेळी लोकमानसाप्रमाणे स्त्रियांना प्रवेश निशिद्ध असतो. अडवई गावचा कुंकळकर कुंभार या लग्नासाठी खास वधू आणि वराच्या मातीची प्रतिमा तयार करून देतो. धामण, भेरली माड, तळ्यार सारख्या जागी त्याचे अस्तित्व लोक मानीत आलेले आहेत. तुरळक लोकवस्तीचा सत्तरी तालुक्यातील खोडये गाव जैवविविधतेने नटलेला आहे. नागमोडी रस्ता, दुतर्फा घनदाट जंगल, मुबलक पाणी, जंगली जनावरे, पशुपक्षांचा वावर; एकमेकांवर मनापासून प्रेम करणारी, अडीअडचणीला धावणारी माणसे इथे आहेत. कुंभारखण गावाच्या डोंगरावर उगम पावणाऱ्या ओहोळाच्या काठावर देवचाराच्या लग्नाचे विधी केले जातात. लग्नाला मंगलाष्टके म्हटली जात नाहीत. पाच मातीची भांडी, वधू-वराच्या मातीच्या प्रतिमा असतात. एका माडकीत तांदूळ, गूळ घालून 'घाणो' शिजवतात. तोच प्रसाद म्हणून सर्वांना वाटला जातो. माणसाच्या लग्नासाठी जसे वाजंत्री हवे असतात, तसेच वाजंत्री देवचाराच्या लग्नालाही बोलाविले जातात. मात्र हे वाजंत्री प्रतिकात्मक, मातीचे असतात, जे कुंभाराकडून तयार करून घेतलेले असतात. देवचाराच्या लग्नात पशुपक्षी, प्राणी सर्वजण येतात, मात्र ते मातीच्या प्रतिमांच्या रूपाने.
खोडये - तळपार धामण, भिल्लो माड - कराडेश्वर देवचार, घोटींगाचे झाड आणि कणकीची मोठी बेटे आहेत. जुनी जाणती व्यक्तिमत्त्वे आजही येथील प्रथा-परंपरांचा सन्मान करताना श्रद्धेने या विधीत मनःपूर्वक सहभागी होतात. लाल फुले, फणी, आरसा, मंगळसूत्र, हिरवा चुडा, पान-विडा या जागी अर्पण केला जातो. कुंभारखणीच्या डोंगराचा व्हाळ आणि खोडये डोंगराचा व्हाळ एकत्रित होऊन अडवईतल्या व्हाळाशी एकरूप होतात. पाच दिवस घाणो, गूळ, तांदूळ, नारळ घालून प्रसाद शिजवतात. पूर्वी येथे गोठणीवर जनावरांना चरायला नेले जात असे - सासण देवीचे अस्तित्व होते. त्यासाठी सत्तर वाड्यो घालतात. सातेर, केळबाय आणि सासणाचे झाड येथे आहे. त्यामुळे 'सासण देवी' हे नाव देवीला पडले असावे. सासण देवी ही वनदेवीच आहे. चार जागा, तीन लिंगे, गावकर वाढत असलेल्या ७० वाड्यो, ज्या केळीच्या पानावर ३५ तुकडे करून वाढल्या जातात. खिचडी केली जाते. तेथील प्रसाद कोणीही घरी आणत नाही. एकदा प्रसाद अजाणतेपणी घरी नेऊन खाल्ल्यावर एक माणूस वारला होता, असे लोक सांगतात.
खोडयेचा थोरला आणि वाघुरेचा धाकटा गावकर; या धाकट्यानेच सुरंगाच्या मळावर लिंग ठेवले. व्याघ्रेश्वर तेथे प्रस्थापित झाला. तिथे वाघाचे अस्तित्व आहे. खोडये गावात थोरला स्थायिक होतो, तर वाघूरेत धाकटा स्थिरावतो. सातेरीच्या जुन्या मंदिराचे मोठे चिरे आहेत, तीच तिच्या प्रेरणादायी अस्तित्वाची खूण आहे. हा परिसर तसा थंड आणि शांत आहे. खाणीच्या वाढत्या प्रदूषणामुळे रुक्ष, कोरडा होता होता पुन्हा एकदा हिरवाईची चैतन्यदायी शाल पांघरली आहे. खोडये गावात देवचाराचे लग्न हा विधी त्याच्या संतुष्टीसाठी आहे, जेणेकरून गावावर कोणतेही अरिष्ट येता कामा नये. त्याच्या मायेच्या छत्राखाली सर्वांनी गुण्यागोविंदाने वागावे, हीच भावना असते. त्याच्यावर असलेली मनःपूर्वक श्रद्धाच आपल्याला जीवनात स्थिरता देईल, ही खात्री असते. देवचाराचे लग्न लावले नाही तर गावात अराजकता माजेल, असे मानले जाते. वाघूरे गावात वाघाला अभय आहे. गुरावासरांच्या जीवाला जंगली श्वापदांपासून भय असते. वाघ गुरावर हल्ला करेल ही भीती असली तरी, वाघाची कधीच हत्या करू नये असे मानले जाते. हत्या केली तर मनुष्य निःसंतान होतो, अशी धारणा आहे. रात्रीच्या वेळी तेथून वरात जात असल्याचा भास होतो, असा समज लोकमनात रूढ आहे. या नियमाचे आजही तेवढ्याच श्रद्धेने पालन केले जात आहे. खोडयेच्या शेजारील वाघूरे गाव समृद्ध वनराईने नटलेला आहे. वाघ हे या गावचे भूषण. गावावर कोणतेही अरिष्ट येता कामा नये म्हणून खोडये गावात देवचाराचे लग्न लावण्याची परंपरा वर्षोनुवर्षे आत्मीय श्रद्धेने सुरू आहे.

- पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)