आठवणीतील कमळी...

​ती आपल्या छोट्या मुलीला घेऊन वणवण भटकू लागली. कधी लोकांच्या दारात, कधी झाडाखाली, तर कधी स्मशानभूमीतही बसायची. मुलगी मोठी झाल्यावर तिला वडिलांकडे सोडून ती एकटीच भटकू लागली. त्या मानसिक अवस्थेत ती विचित्र वागायची, कधी ओरडायची तर कधी शिव्या द्यायची.

Story: कथा |
10th January, 11:55 pm
आठवणीतील कमळी...

​मी तेव्हा दुसरीला होते. रोजच्यासारखी शाळेत जाण्यासाठी मी व माझ्या मैत्रिणी गप्पा मारत चाललो होतो. अचानक आमच्या समोरून एक बाई येताना दिसली. तिने जुने झालेले निळ्या रंगाचे कापड नेसले होते. हातात एक पिशवी आणि डोक्यावर एक बोचके घेऊन ती चालली होती. शाळेत जाताना मी आणि माझ्या मैत्रिणी फक्त तिच्याकडेच पाहत होतो. त्या दिवशी माझ्या डोक्यात तिचाच विचार होता. तिचा तो चेहरा माझ्या डोळ्यासमोर वारंवार येत होता. असे वाटत होते की, कधी एकदा घरी जाते आणि त्या वाटेत पुन्हा तिला बघते. पण जेव्हा माझी शाळा सुटली, तेव्हा ती मला रस्त्यात दिसली नाही.

​आमच्या घराच्या बाजूला एक कोसळलेले घर होते, ती त्याच्या उंबरठ्यावर बसली होती. मग ती तिथेच राहू लागली. तिच्याजवळ फक्त चार भांडी आणि दोन कपडे होते. तिथेच तिने आपला संसार मांडला होता. ती लोकांची कामे करायची. एके दिवशी ती आमच्या घरी कामासाठी आली. अंगण सारवणे, रांगोळी घालणे, झाडांना पाणी घालणे आणि लाकडे तोडून आणणे ही कामे करायला तिला खूप आवडायचे. तिने आमचे अंगण सारवून सुंदर रांगोळी काढली. जेव्हा आई तिला पैसे देऊ लागली, तेव्हा तिने ते नाकारले आणि म्हणाली, “मला पैसे नकोत, मला एक भाकरी आणि भाजलेला सुका बांगडा द्या.” ते तिचे आवडीचे खाद्य होते.

​ती आमच्या घरी आली याचा मला खूप आनंद झाला होता. मला तिच्याशी कधी एकदा बोलते असे झाले होते, पण आईने स्पष्ट बजावले होते की, ‘अनोळखी माणसांशी बोलायचे नाही.’ मला तिचे खूप वाईट वाटायचे. म्हणून जेव्हा घरी कोणी नसायचे, तेव्हा मी तिला पाहण्यासाठी हळूच जायची. ती तिथेच बसून कधी एकटीच बडबडायची, तर कधी रस्त्यावरील गाड्या मोजायची. एके दिवशी तिने मला बघितले. मी थोडी घाबरले होते, पण तिच्याजवळ गेले. ती मला बघताच प्रेमाने ‘चिमु’ म्हणू लागली आणि तिथूनच आमची मैत्री झाली. तिचे रूप पाहून माझ्या मनात येणारे प्रश्न मी तिला विचारायची, पण ती त्यांची उत्तरे कधीच द्यायची नाही. ती फक्त एकच सांगायची, “ते सोड, मला आठवत नाही.” तिचे हे उत्तर ऐकून मला काहीतरी वेगळेच वाटायचे.

​मी घराबाहेर अभ्यासाला बसले की ती कामाला जाताना मला हात दाखवून हसत सांगायची, “नीट अभ्यास कर.” असाच एक दिवस ती माझ्या काकांकडे कामाला गेली होती. तिथे झाडांना पाणी घालताना चुकून तिच्याकडून एक फुलाचे रोप मोडले. तेव्हा माझ्या चुलत काकीने तिला मारले. ती खाली पडली आणि तिच्या डोक्याला लागले. तिथे मोठे भांडण झाले. दुपारच्या वेळी ती आपल्या जागेवर परतली. ती रोज माझ्याकडे बघून हसायची, पण त्या दिवशी मात्र ती गप्प होती. ती गप्प आहे म्हणून मी तिच्याजवळ गेले, तर तिच्या डोक्याला लागले होते आणि ती रडत होती. मला आधी भीती वाटली, पण मी धीर धरून तिच्याजवळ गेले आणि तिला “शांत हो” म्हटले. ती शांत झाली. मी घरातून तिच्यासाठी भाकरी घेऊन आले होते, ती पाहून ती खूप खुश झाली.

​मला आता तिची सवय झाली होती. रोज दुपारी ती रस्त्यावरील गाड्यांकडे आशेने बघत मला सांगायची, “आता तुझा मामा येणार आणि तुझ्यासाठी खाऊ आणणार.” ती मला ‘चिमु-चिमु’ म्हणत गोष्टी सांगायची. मी तिला ‘भटाची कमळी’ म्हणायचे. तिच्याबरोबर जंगलात जाणे, फळे खाणे आणि फिरणे यात मला खूप आनंद मिळायचा. ती मला भरभरून हसवायची. पण मी लोकांकडून ऐकले होते की ती खूप वाईट आहे, शिव्या देते, वेड्यासारखी वागते. माझी आईसुद्धा मला हेच सांगायची. ती नदीवर गावातील बायकांशी भांडायची. एकदा तिचे आईशीही भांडण झाले होते, म्हणून आईला तिचा राग यायचा. पण मी आईची नजर चुकवून तिच्याकडे जायची आणि तिला काहीतरी खायला द्यायची.

​सांयकाळी आई-बाबा कामावरून आल्यावर मला भीती वाटायची की आई मला ओरडेल; कारण गावातील बायका मी कमळीशी बोलते हे आईला सांगायच्या. पण आईने मला काहीच न बोलता रात्री शांतपणे समजावून सांगितले. ती म्हणाली, “बाळा, तिला ‘भटाची कमळी’ म्हणण्याचे कारण म्हणजे तिचे माहेर ‘भट’ हे गाव होते. तिथे जवळच्याच एका गावात तिचे लग्न झाले होते. तिचा संसार सुखात सुरू होता, तिला तीन मुलेही होती. पण शेवटची मुलगी झाल्यावर तिची प्रकृती बिघडली. तिचा तिच्या नवऱ्यावर खूप विश्वास होता, पण त्याने विश्वासघात केला. तो दुसऱ्या एका स्त्रीच्या नादी लागला होता. हे समजल्यावर तिला मोठा मानसिक धक्का बसला आणि तिने घर सोडले.”

​ती आपल्या छोट्या मुलीला घेऊन वणवण भटकू लागली. कधी लोकांच्या दारात, कधी झाडाखाली, तर कधी स्मशानभूमीतही बसायची. मुलगी मोठी झाल्यावर तिला वडिलांकडे सोडून ती एकटीच भटकू लागली. त्या मानसिक अवस्थेत ती विचित्र वागायची, कधी ओरडायची तर कधी शिव्या द्यायची. भटकता भटकता ती आमच्या गावात आली होती. ती आमच्या गावात फक्त तीन वर्षे राहिली. आईचे हे बोलणे ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. पण ती माझ्या आठवणीत कायम राहील.

​आता ती आमच्या शेजारच्या गावातील बस स्टॉपवर राहते. तिची स्मृती पूर्णपणे क्षीण झाली आहे. ती आता कुठे फिरत नाही, तिथेच बसून असते. जेव्हा कधी मी त्या गावातून जाते, तेव्हा ती मला अशा दीन अवस्थेत दिसते की खूप वाईट वाटते...


- सुरेखा वरंडेकर