
वांगं म्हटलं की सगळ्यांना माहिती असणारे पदार्थ म्हणजे वांग्याची काप, भरलेलं वांगं हे असणार. पण हा पदार्थ अगदी जुना आणि खूपच चविष्ट असा आहे. चला तर बघूया.
साहित्य:
एक मोठं भरताचं वांगं.
१ ते २ बारीक चिरलेले कांदे.
२ बारीक चमचे चिंचेचं पाणी.
१ बारीक चमचा मोहरी.
३ ते ४ चमचे तेल.
एक मोठा चमचा बारीक चिरलेला लसूण.
एक बारीक चमचा बारीक चिरलेलं आलं.
चवीनुसार गूळ / साखर (गोडवा पाहिजे असल्यास).
२ बारीक चमचे खोबरेल तेल.
चवीनुसार मीठ.
खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती:
सर्वात आधी भरताच्या वांग्याला सगळ्या बाजूने खोबरेल तेल लावा आणि सुरीने त्याला थोडे टोचे मारून घ्या. आता हे वांगं गॅसवर किंवा चुलीवर खरपूस भाजून घ्या. आता वांग्याच्या वरच्या भाजलेल्या साली काढून टाका आणि हाताने छान स्मॅश करून (पेस्ट करून) घ्या. फोडणीच्या भांड्यात तेल घ्या. तेल गरम झालं की त्यात मोहरी घाला. मोहरी छान तडतडली की त्यात आलं, लसूण घाला व सोनेरी रंग आला की ही फोडणी वांग्यामध्ये घाला. आता यात वरून चिंच पाणी, कांदा, साखर/गूळ, खूप सारी कोथिंबीर आणि पाहिजे असल्यास खोबरं घाला आणि सर्व एकत्र करा. हे भरीत तुम्ही चपाती, भाकरी किंवा जेवणाबरोबर खाऊ शकता.
टीप:
* वांगं भाजायला घालायच्या आधी त्याला शक्यतो खोबरेल तेल लावा, म्हणजे भरताला छान चव येते.
* वांगं भाजायला शक्यतो चुलीचा वापर करा.

- संचिता केळकर