धालोचा मांड आणि फुगड्यांची गुंफण

गोव्याच्या मातीतील 'धालो' हा केवळ उत्सव नसून कष्टकरी स्त्रियांच्या भावविश्वाचा आरसा आहे. वनदेवीची थोरवी आणि विविध फुगड्यांच्या माध्यमातून उलगडणारा हा स्त्री-शक्तीचा सोहळा नक्की अनुभवा.

Story: भरजरी |
10th January, 11:45 pm
धालोचा मांड आणि फुगड्यांची गुंफण

पहिल्या रात्री गावातील मालन धालोसाठी पात धरून उभ्या राहतात. त्यानंतर सलग पाच रात्रींपर्यंत धालो खेळतात. धालो खेळणे म्हणजे काय? तर वनदेवी मातेच्या थोरवीची गाणी गात तिचा आशीर्वाद मागणे.

​या धालोच्या दिवसात खेळल्या जाणाऱ्या काही खास फुगड्या असतात. त्या फुगड्या म्हणजे घारीची फुगडी, कुवाळ्याची फुगडी, गुडगुडाची फुगडी इत्यादी. या फुगड्या म्हणजे धालोची खरी रंगत.

​घारीच्या फुगडीमध्ये एक मालन 'घार' असते आणि एक 'कोंबडी' असते; जिच्या मागे लहान लहान पिले बनवून इतर मालनी साखळी तयार करतात. घार झालेली मालन कोंबडीकडून तिच्या पिलांना पळवून नेण्याच्या बेतात असते. हे बघून कोंबडी घारीला विचारते:

​'कीद्याक गे घारी जळापतय,

माझं बिल वळखतय,

किद्याक गे घारी जळापतय,

माझं पील वळखतय,

तुजी पिलां खुयची,

पाणीपोणा धापलेली,

ना पील दिवची,

एक पील वरतली,

झाडार बसून खातली,

ना तुका दिवची'

​अशा प्रकारे घार निष्पाप कोंबडीच्या पिलांना पळवण्याच्या बेतात असताना, कोंबडी आपल्या पिलांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहे, हे दृश्य दर्शवणारी फुगडी ही धालोतील एक महत्त्वाची फुगडी होय.

​त्यानंतर विशेष प्रसिद्ध आहे ती 'कुवाळ्याची फुगडी'.

‘आवाळो गे कुवाळो,

राजाच्या बायलेक दुवाळो लागला,

कुवाळो मागितला गे सये,

कुवाळो मागितला'

​एरवी गोमंतकामध्ये 'कुवाळो' (कोहळा) हे फळ जरासे भयावह मानले जाते. इतर ठिकाणी कोहळ्याला बरीच मागणी असली तरी गोमंतकात त्याला बळीस्वरूपात बघितले जाते. पूर्वीच्या काळी काही ठिकाणी नरबळी दिला जायचा, त्याला पर्याय म्हणून 'कुवाळा' कापण्याची प्रथा आहे. त्यामुळे कुवाळा कापणे म्हणजे नरबळी देणे, असा एक सरसकट समज इथल्या समाजात प्रचलित आहे. याच भीतीदायक कुवाळ्याचा डोहाळा  राजाच्या बायकोला लागला, तर आता काय करणार? अशी गमतीशीर फुगडी या वेळी घातली जाते.

​त्यानंतर अजून एक खास आकर्षण म्हणजे 'गुडगुडया नळयेची फुगडी'.

​गुडगुडे माझ्या नळये गे,

गुडगुडे माझ्या नळये,

मासोर्डे गावच्या तळये गे,

मासोर्डे गावच्या तळये,

वनदेवी माय न्हाली गे,

मांडार खेळोपाक आली गे,

मांडार खेळोपाक आली,

मांडाची शोभा झाली गे...

​एकमेकांचा हात धरून गोल साखळी करत घातली जाणारी ही फुगडी. यामध्ये धालोची अधिष्ठात्री देवता 'वनदेवी' हिला फुगडी खेळण्यासाठी मालन आवाहन करते. मासुर्डे गावच्या तळ्यामध्ये माझ्या वनदेवी मातेने स्नान केले. शुचिर्भूत होऊन माझी माता धालोच्या मांडावर खेळायला आली आणि त्यामुळे मांडाला खरी शोभा आली. अशी सुंदर कल्पना मांडणारी फुगडी मालन गात असताना, प्रत्यक्ष वनदेवी आपल्यासोबत खेळत असल्याचा भास प्रत्येकाला 

होत असतो.

​या आणि अशा अनेक फुगड्या घालत चार रात्री मालन मध्यरात्रीपर्यंत धालो खेळते. पाचव्या रात्री पूर्ण रात्र जागरण करून वनदेवीच्या आराधनेत तल्लीन होऊन पहाटेपर्यंत नाचते. आणि भल्या पहाटे मालन गाऊ लागते:

​भावडीच्या माथ्यार थेयलो कळो,

भावडी नाचता मळ्यान मळो,

वनदेवते माय वे तुझी माझी जोडी,

घाल फुगडी आता घडोघडी.

​"वनदेवते माय, तुझी आणि माझी जोडी सख्ख्या जिवलग मैत्रिणींसारखी आहे. ही मैत्री अशीच अखंड जोडून ठेवूया आणि दोघी मिळून घडोघडी फुगडी घालत राहूया."

​धालोचा मांड म्हणजे त्या दिवसांतील गावामधले एक पवित्र ठिकाण. रात्री-बेरात्री जरी स्त्रिया तिथे बेभान होऊन नाचत असल्या, तरी वनदेवी मातेचे संरक्षण तिथल्या प्रत्येक जीवाला असते. वर्षभर काबाडकष्ट करणारी स्त्री या पाच दिवसांत स्वतःला मोकळीक देते. कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारीच्या बंधनांनी वेढलेली घरणीबाई या दिवसांत सगळी बंधने तोडून मनसोक्त नाचते. आपल्या वनदेवीचे कौतुक करतानाच, येणारे वर्षभर आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्याचे साकडे ती घालत असते. आपल्या गोड आवाजाने वनदेवीची थोरवी गाताना ती मनातल्या मनात देवीशी संवाद साधते, आपली दुःखे कथन करते आणि ती दूर करण्यासाठी 

विनवणी करते.

​धालोचे हे पाच दिवस म्हणजे केवळ खेळ नसून, वर्षभरासाठीचे बळ, हिम्मत, धैर्य आणि सहनशीलता ती वनदेवीकडे मागत असते. त्याचबरोबर आपले कुंकू अखंड ठेवण्याचे वरदानही ती मागून घेते. हे वरदान मागताना उपस्थित स्त्रियांच्या कपाळी हळदीकुंकू लावून त्यांना फुलांची पाकळी दिली जाते. हे हळदीकुंकू म्हणजे तिच्या सौभाग्याची राखण आणि समोरच्या मालणीला दिलेला सौभाग्याचा आहेर असतो.


- गाैतमी चाेर्लेकर गावस