भारतात रस्त्यावर काय दिसेल याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे, पण रस्त्यावरील 'डॉक्टरांची' संख्या मात्र लोकसंख्येपेक्षाही वेगाने वाढतेय. अशक्य कोटीतील रोगांवर 'विना ऑपरेशन' इलाज करणाऱ्या जाहिराती पाहून असे वाटते की, हे डॉक्टर म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील 'सुपरमॅन'च आहेत.

भारतात आजकाल दोनच गोष्टी वेगाने वाढतायत. एक म्हणजे लोकसंख्या आणि दुसरी म्हणजे त्या लोकसंख्येला 'ठणठणीत' करण्याचा दावा करणारे गल्लीतले डॉक्टर! खरंतर, आपल्या देशात एखादा माणूस आजारी पडला की तो सर्वात आधी 'डॉक्टर' शोधत नाही, तर तो आपल्या आठवणींच्या कपाटातून 'घरगुती उपाय' आणि 'कोणीतरी सांगितलेले अघोरी पथ्य' शोधतो. भारताची खरी प्रकृती ही 'स्टेथोस्कोप'मध्ये नाही, तर बस स्टँडवरच्या भिंतीवर चिकटवलेल्या 'असाध्य रोगांवर खात्रीशीर उपाय' असलेल्या पिवळ्या जाहिरातींमध्ये दडलेली आहे. वैद्यकीय विज्ञानाने कितीही मोठी उडी मारली तरी ओ.पी.डी.त लागणाऱ्या रांगेपेक्षा जास्त गर्दी आजही 'हाडं जोडणाऱ्या बाबांच्या' तंबूत दिसते. भारतातील रेल्वे स्थानकावर ‘३० दिवसांत डॉक्टर कसे बनावे’ यासारखे पुस्तक सुद्धा मिळू शकते, तेव्हा बाकी सर्व काही शक्य आहे.
भारतात रोगापेक्षा वेगाने वाढतेय ती या रोगांची 'व्याख्या'. रोग असे की, ज्याचे निदान स्वतः ब्रह्मदेवही करू शकणार नाहीत. डॉक्टरने जर चुकून विचारले, "काय होतंय?" तर पेशंटचे उत्तर असते, "पोटात काहीतरी 'गुडूगुडू' होतंय!" आता या 'गुडूगुडू'चा वैद्यकीय विज्ञानात नक्की काय अर्थ होतो, हे शोधण्यासाठी एम्सलाही संशोधन करावे लागेल. कुणालाही प्रकृतीबद्दल विचारा, "जाम पडलोय!" हे एक पेटंट उत्तर ठरलेले असतेच. आता माणूस 'जाम' पडलाय म्हटल्यावर त्याला औषध द्यायचे की ब्रेडवर लावायचे? हेच कळत नाही.
जसे रोग विचित्र आणि अनेक, तसेच आमचे डॉक्टर सुद्धा महा-विचित्र! मानवी शरीरात जितके भाग असतात, त्या प्रत्येक भागाला एक स्वतंत्र रोग, कॅन्सर किंवा ट्युमर असतोच आणि नशिबाने त्या प्रत्येक इंचाचा एक विशेष 'स्पेशालिस्ट' डॉक्टर सुद्धा उपलब्ध असतो. भारतात रस्त्यावर काय दिसेल याचा अंदाज वर्तवणे कठीण आहे, पण रस्त्यावरील 'डॉक्टरांची' संख्या मात्र लोकसंख्येपेक्षाही वेगाने वाढतेय. अशक्य कोटीतील रोगांवर 'विना ऑपरेशन' इलाज करणाऱ्या जाहिराती पाहून असे वाटते की, हे डॉक्टर म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील 'सुपरमॅन'च आहेत. जपानी कॉम्प्युटर वापरून डोळ्यांचा इलाज, विना रेडिएशन आणि कीमो कॅन्सरचा पूर्ण नायनाट... जवळपास सर्व प्रकारचे असाध्य रोग, जे कदाचित भारत व देश-विदेशातील मोठ्या इस्पितळांना सुद्धा बरे करण्यास जमत नसतील, ते बरे करण्याचा दावा या जाहिराती छातीठोकपणे करतात.
मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातल्या मुहास गावात तर एक हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे. जिथे डॉक्टरांनी हात टेकले, तिथे हनुमानजींनी सावरले! इथले हनुमानजी चक्क लोकांच्या दुखण्यावर 'कन्सल्टन्सी' देतात म्हणे. सातासमुद्रापारचे लोकही इथे आपले क्लेश मिटवण्यासाठी हजेरी लावत आहेत. इथले पुजारी म्हणजे 'हाडांचे इंटरनॅशनल स्पेशालिस्ट' आहेत. गेल्या ४० वर्षांपासून हा 'वैद्यकीय चमत्कार' अविरत सुरू आहे आणि लोकही ठणठणीत बरे होऊन घरी जात असल्याचा दावा केला जातो. प्रत्येक शनिवार आणि मंगळवारी इथे भक्तांची, माफ करा, 'रुग्णांची' तुडुंब गर्दी असते. उपचाराची पद्धत एकदम साधी पण 'युनिक' आहे: हाडांचे रुग्ण रांगेत शिस्तीत बसतात, जणू काही हाडांची 'असेम्बली' सुरू आहे. त्यांच्याकडून सामूहिकरीत्या जप करून घेतला जातो. जप पूर्ण झाला की, मंदिराचे पुजारी त्यांना कसलीतरी गूढ 'जडीबुटी' देतात. म्हणजे ‘ऐसी जडी, कि कर दूँगा बुढिया की खटिया खडी!’ राजस्थानहून आलेल्या एका भक्ताची कथा तर रंजक आहे. तो मोटरसायकलवरून पडला होता, हाडं चक्काचूर झाली होती, डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन सांगितले होते. पण एका मित्राच्या सल्ल्यावरून तो इथे आला आणि पुजाऱ्याने दिलेली जडीबुटी पोटात जाताच, त्याला लगेच 'फरक' पडल्यासारखे वाटू लागले!
फिदायीन सोडल्यास सर्व माणसांना एकच भीती असते, ती म्हणजे मरण्याची. आजवर आपण ऐकत आलो होतो की मरणावर काहीच उपाय नाही. पण आता मरणालाही ‘भिवपाची गरज ना’. कारण आता आले आहेत अहमदाबादमधील नाना चिलोडा येथील जगप्रसिद्ध डॉ. मुन्नाभाई तिवारी! त्यांनी आपल्या पोस्टरवर क्रांतीच केलीय. "मरे हुए ईन्सान को जिंदा किया जाता।" (पोस्टरवर 'इनसान' शब्द चुकीचा लिहिलाय, कदाचित जिवंत करण्याच्या घाईत स्पेलिंगकडे लक्ष द्यायला वेळ नसावा). तिवारीजींनी आपले क्लिनिक जर भारतातील सर्व स्मशानभूमींच्या बाहेर टाकले, तर यमराजाचा धंदा पार बसल्यात जमा होईल. बिचारे यमराज आता आपल्या रेड्यावर बसून राजीनामा देण्याचा गांभीर्याने विचार करत असतील. चित्रगुप्तांचा सगळा 'डेटाबेस' आता रद्दी झालाय. इकडून यमराज एखाद्याचा आत्मा घेऊन वर पोहोचत असतील, तिकडून खाली मुन्नाभाईंनी त्याला पुन्हा 'रिबूट' करून खेचून आणलेले असेल. आता तर नरक आणि स्वर्गातही शुकशुकाट झाला असेल, कारण तिवारीजींनी 'एक्झिट गेट'लाच कायमचं टाळं ठोकलं आहे. बिचारे यमराज! वर्षानुवर्षे ओव्हरटाईम करून त्यांनी लोकांचे प्राण हरण केले, आता वरच्या जगात चर्चा सुरू असेल, "चित्रगुप्त, या तिवारींनी तर आपली पूर्ण सिस्टमच हॅक केली आहे!" जगभरातले शास्त्रज्ञ 'अँटी-एजिंग' आणि 'अमरत्व' शोधण्यासाठी अब्जावधी डॉलर्स उडवत आहेत, इकडे शंकरनगर सोसायटीमध्ये हे काम किरकोळ फीमध्ये होतंय. पण मेलेल्याला जिवंत करण्याचे 'साईड इफेक्ट्स' मोठे असतील. विचार करा, जर हे तंत्रज्ञान खरंच चाललं तर सरकार हैराण होईल. जे आजोबा १० वर्षांपूर्वी 'एक्झिट' झाले होते, ते पुन्हा पेन्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहतील! मालमत्तेचे वाद तर संपणारच नाहीत. मृत्युपत्र वाचत असतानाच जर आजोबा अचानक उठून बसले आणि म्हणाले, "बेटा, अजून १० वर्ष तरी मी प्रॉपर्टी सोडणार नाही," तर बिचाऱ्या वारसांचे काय होईल? तिवारीजींनी आपल्या फोटोच्या बाजूला मोबाईल नंबरही दिला आहे. कदाचित यमराजांनीही तो नंबर सेव्ह केला असेल, हे विचारण्यासाठी "भावा, किमान रविवारी तरी सुट्टी देत जा, आम्हाला आमचा कोटा पूर्ण करू दे!" याच तिवारीजींनी पुढे लिहिलेय - "मूतखड्याचे त्वरित निवारण, कंबरदुखी तीन दिवसांत गायब." (आता विशेष म्हणजे, ते डॉक्टर सुद्धा नाहीत! त्यांची एक मुलाखत तुम्ही इथे पाहू शकता: https://www.youtube.com/watch?v=f1UM3zQj790)
यानंतर क्रमांक लागतो तो ‘सडकछाप डेंटल क्लिनिक’चा. हे म्हणजे फुटपाथवरचे एक चालते-फिरते 'जबडा सुधार केंद्रच' आहे. जिथे मोठे डेंटिस्ट पांढरा कोट घालून, अपॉइंटमेंटसाठी आठवडाभर वाट पाहायला लावतात, तिथेच आपले हे 'फुटपाथ सम्राट' डॉक्टर साहेब खुल्या आकाशाखाली, ताज्या हवेत तुमच्या दाढेशी कुस्ती खेळायला तयार असतात. १५ फेब्रुवारी २०२५ ला मला फरीदाबाद येथे फुटपाथवर एक पोस्टर दिसले. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिले होते "दाढ, दात काढले व लावले जातात." वा! किती पारदर्शकता आहे. इथे 'रूट कॅनाल' किंवा 'पेरिओडॉन्टिक्स' सारखे जड शब्द वापरून रुग्णाला घाबरवले जात नाही. इथे एकतर दात असेल किंवा नसेल, 'मधला मार्ग' इथे नसतोच. खालची ओळ तर मास्टरस्ट्रोक आहे: "दाढेत चांदी व मसाला भरला जातो." हे वाचून शंका येते की हा डेंटिस्ट आहे की एखादा हलवाई किंवा गवंडी? काय दाताच्या जागी समोसा समजून त्यात मसाला भरायचा आहे का? रुग्णासाठी इथे ती गोल फिरणारी हायड्रॉलिक खुर्ची नसते. शांतपणे जमिनीवर बसा, निसर्गाशी नातं जोडा आणि आपला मौल्यवान जबडा नशिबाच्या हवाली करा. डॉक्टर साहेबांचे 'ऑपरेशन थिएटर' म्हणजे एक जुनी सुटकेस आहे, जी कदाचित पूर्वी कपडे भरण्यासाठी वापरली जात असे, पण आता ती दातांची 'स्मशानभूमी' आणि 'जन्मभूमी' दोन्ही आहे. याच एका सुटकेसमध्ये संपूर्ण दातांची कवळी उपलब्ध आहे. सर्व सुशिक्षित डॉक्टर हातमोजे घालतात, पण इथे डॉक्टर साहेब उघड्या हातांनी 'कलाकुसर' करत असतात. त्यांचा असा ठाम विश्वास असावा की, मातीतून आलेल्या या देहाचा इलाज जर माती लागलेल्या हातांनी झाला, तर 'नॅचरोपॅथी'चा प्रभाव जास्त पडतो. जंतूंनाही इथे यायला भीती वाटत असेल, कारण इथले वातावरण पाहून दाताला कीड लागण्याऐवजी भीतीपोटी घाम फुटेल! सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे तो 'मसाला'. डेंटिस्ट ज्याला 'फिलिंग' म्हणतात, इथे तो निव्वळ मसाला आहे. आता हा गरम मसाला आहे, चाट मसाला आहे की चुना-कात, हे फक्त तो 'मास्टरशेफ' डॉक्टरच जाणे. "चांदी भरणे" हे ऐकून तर असं वाटतं की दाताचा इलाज नाही, तर एखाद्या दागिन्याची 'पॉलिश' किंवा दुरुस्ती चालली आहे. भारतात 'भीती' आणि 'गरज' यांच्यातील अंतर फार कमी आहे. हे दुकान त्या लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे इन्शुरन्स नाही, पण वेदना अफाट आहेत. इथे 'अॅनेस्थेशिया'ची गरजच पडत नाही, कारण उपचार सुरू होण्यापूर्वी इथले 'स्वस्त बिल' बघूनच रुग्ण अर्धा 'सुन्न' झालेला असतो.

- आदित्य सिनाय भांगी,
पणजी