स्पर्धा परीक्षा यशमंत्र: चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचा सराव

यशस्वी अभ्यासासाठी केवळ वाचन पुरेसे नसून माहितीचे योग्य वर्गीकरण महत्त्वाचे आहे. शासकीय योजना, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि संस्थात्मक पदांची पद्धतशीर नोंद कशी करावी, याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन.

Story: यशस्वी भव: |
10th January, 11:41 pm
स्पर्धा परीक्षा यशमंत्र: चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचा सराव

कोणतीही स्पर्धा परीक्षा असली तरी, परीक्षेमध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न म्हणजे 'सामान्य ज्ञान' आणि 'चालू घडामोडी'. मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, आर्किटेक्चर किंवा शिक्षक भरती यांसारख्या परीक्षा वगळल्यास, इतर सर्व परीक्षांमध्ये या विषयावर प्रश्न असतात. प्रामुख्याने यूपीएससी (UPSC), बँकिंग, रेल्वे, एनडीए (NDA) यांसारख्या परीक्षांमध्ये हे विषय महत्त्वाचे ठरतात. चालू घडामोडींचा अभ्यास कितीही केला तरी तो पुरेसा वाटत नाही; कारण दर सेकंदाला जगात काही ना काही नवीन घडतच असते. नेमके काय लक्षात ठेवावे? यामुळेच या विषयाचा अभ्यास करणे 'ट्रिकी' असते.

​'चालू' याचा अर्थ साधारणपणे चालू असलेल्या दिवसापासून मागील एक ते दीड वर्षात ज्या घटना घडल्या, त्यांना 'चालू घडामोडी' अर्थात 'करंट अफेअर्स' असे म्हणतात. रोज कोणतेही वर्तमानपत्र उघडले की देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील किमान २० तरी नवीन बातम्या दिसतात. मागील ५०० दिवसांमधील अशा बातम्या लक्षात ठेवणे ही एक मोठी कसरत आहे, पण योग्य नियोजनातून यातून मार्ग काढता येतो.

​अभ्यास करताना शहरातील स्थानिक (लोकल) बातम्या वर्ज्य कराव्यात. राज्य आणि देश पातळीवरील बातम्या अधिक महत्त्वाच्या ठरतात, त्यामुळे अभ्यासाला 'फिल्टर्स' लावावेत. अभ्यासासाठी एक स्वतंत्र वही करावी आणि त्यात स्वतःच्या हाताने माहिती लिहावी. 'लिहिले की जास्त लक्षात राहते' या तत्त्वाचा वापर करावा. वहीमध्ये शहर, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय असे चार विभाग करावेत. साधारणपणे ४०० पानांची वही करून प्रत्येक विभागाला ५० ते १०० पाने राखून ठेवावीत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींसाठी अधिक पाने ठेवावीत.

​१. राष्ट्रीय संस्था व पदाधिकारी:

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था तसेच त्यांचे अध्यक्ष किंवा सचिव यांचे स्वतंत्र कोष्टक (Table) तयार करावे. त्यात खालील माहिती नमूद करावी:

​संस्थेचे नाव (नाव बदलले असल्यास सुधारित नाव).

​स्थापना तारीख आणि वर्ष.

​माजी आणि आजी (सध्याचे) प्रमुख पदाधिकारी यांची नावे.

​यात प्रामुख्याने रिझर्व्ह बँक (RBI), इलेक्शन कमिशन, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), रेल्वे मंत्रालय, आधार केंद्र, भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर (BARC), आय.आय.टी. (IIT), परराष्ट्र मंत्रालय, नीती आयोग, आयकर विभाग, सर्वोच्च व उच्च न्यायालये, संरक्षण दलांचे प्रमुख, सीबीआय (CBI), ईडी (ED) आणि भारतरत्न/पद्म पुरस्कार विजेत्यांचा समावेश असावा.

​२. शासकीय योजनांचे कोष्टक:

शासकीय योजनांची माहिती लिहिताना खालील मुद्दे विचारात घ्यावेत:

​जुन्या व नवीन योजनांची नावे आणि त्यांचा मुख्य हेतू.

​योजना कार्यान्वित झाल्याचे वर्ष आणि त्याचे धोरण.

​राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांची वेगवेगळी नोंद करावी.

​निराधार महिला, मागासवर्गीय, शोषित, पीडित, महिला व बाल कल्याण, वंचित आणि दिव्यांग कामगारांसाठीच्या योजनांची माहिती सविस्तर लिहावी.

​३. नवीन कायदे आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी:

​मागील वर्षात पारित झालेले नवीन कायदे, त्यांचे वर्ष आणि उद्देश यांची नोंद करावी.

​आंतरराष्ट्रीय स्तरावर सात खंडांच्या पद्धतीनुसार घडामोडींची विभागणी करावी.

​विविध देशांचे प्रमुख, पक्षप्रमुख, त्यांची नियुक्ती आणि कार्यकाळ यांची नोंद ठेवावी.

​आंतरराष्ट्रीय संस्थांची सूची करून त्यांचे प्रमुख, कार्ये आणि उद्दिष्टे स्पष्टपणे लिहावीत.


- अॅड. शैलेश  कुलकर्णी
कुर्टी - फोंडा