पीसीओएसमुळे महिलांमध्ये अॅलर्जी कशी वाढते?

पीसीओएस केवळ प्रजनन आरोग्यापुरता मर्यादित नसून, हार्मोनल असंतुलनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती बदलते. यामुळे महिलांमध्ये दीर्घकालीन दाह वाढून धूळ, अन्न किंवा रसायनांपासून होणाऱ्या अॅलर्जीचा त्रास बळावतो.

Story: आरोग्य |
09th January, 10:15 pm
पीसीओएसमुळे महिलांमध्ये अॅलर्जी कशी वाढते?

सकाळी सात वाजता रिया तिच्या रोजच्या वेळेत कामाला जाण्यासाठी बाहेर पडली. हवेत थोडा धूर होता, तिने त्यातून मार्ग काढला. पण तिला श्वास घेताना काहीतरी वेगळे आणि अस्वस्थ वाटत होते. नाकात आतून खाज येत होती, डोळे लाल झाले होते अन् हलकासा श्वास घेण्यासही त्रास होत होता. तिला अचानक जाणवले की, "अरे.. मागच्या काही दिवसांपासून हे असेच होतेय आणि ही लक्षणे काही नेहमीची नाहीत. आपल्या शरीरात काहीतरी वेगळे घडत आहे, ही नक्कीच अॅलर्जीची लक्षणे आहेत."

रियाला काही वर्षांपूर्वी पीसीओएसचे निदान झाले होते. डॉक्टरांनी सांगितले होते की, पीसीओएसच्या हार्मोनल असंतुलनामुळे काही वेळा शरीरातील 'इम्यून सिस्टीम'ची प्रतिक्रिया बदलू शकते अन् त्यामुळे अस्थमा, राहिनायटिस, एक्झिमा यांसारखे त्रास वाढू शकतात. आज तिला जाणवत होते की, हे कदाचित पीसीओएस आणि काही प्रकारच्या अॅलर्जी यांच्यातील संबंधामुळेच होत असावे.

आजच्या काळात महिलांचे आरोग्य अनेक बदलत्या घटकांमुळे प्रभावित होत आहे. त्यामध्ये पीसीओएस (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) ही एक मोठी आणि वाढती समस्या आहे. साधारणपणे प्रजनन आरोग्याशी संबंधित आजार म्हणून ओळखला जाणारा पीसीओएस, प्रत्यक्षात महिलांच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करणारी हार्मोनल व मेटाबॉलिक अवस्था आहे. पीसीओएस आणि अॅलर्जी यांच्यातील संबंध हा महिलांच्या आरोग्यातील तसा दुर्लक्षित पण महत्त्वाचा विषय आहे व अलीकडील वैद्यकीय निरीक्षणांनुसार हा अधिक स्पष्टपणे समोर येत आहे.

पीसीओएस म्हणजे नेमके काय? पीसीओएस ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये अंडाशयांचे कार्य बिघडते आणि हार्मोन्सचे संतुलन ढासळते. यामध्ये:

  •  इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचा समतोल बिघडतो.
  •  अँड्रोजेन्स (पुरुष हार्मोन्स) वाढतात.
  •  अंडोत्सर्जन (Ovulation) नियमित होत नाही.
  •  इन्सुलिन रेसिस्टन्स निर्माण होतो.

यामुळे मासिक पाळी अनियमित होते, वजन वाढते, मुरूम येतात, केस गळतात आणि गर्भधारणेत अडचणी येतात.

अॅलर्जी म्हणजे काय? जेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती काही सामान्य पदार्थांना चुकीच्या प्रकारे प्रतिक्रिया देते, तेव्हा 

त्या स्थितीस अॅलर्जी म्हटले जाऊ 

शकते. 

सामान्य अॅलर्जन्स:

  •  धूळ, परागकण, अन्नपदार्थ (उदा. दूध, अंडी, शेंगदाणे).
  •  औषधे किंवा कीटकांचे दंश.
  •  केमिकल्स, कीटकनाशके, परफ्युम्स.

हार्मोनल असंतुलन आणि अॅलर्जी हार्मोन्स प्रतिकारशक्तीवर प्रभाव टाकत असल्याने हार्मोन्सचे असंतुलन आणि अॅलर्जी यांच्यात अतिशय जवळचा संबंध आहे.

  •  इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन: महिलांमध्ये मासिक पाळीच्या आधी किंवा गर्भधारणेदरम्यान यांचा स्तर बदलतो. विशेष करून इस्ट्रोजेन हा हार्मोन प्रतिकारशक्तीला अधिक सक्रिय करत असल्याने, पीसीओएसमध्ये इस्ट्रोजेनचे असंतुलन झाल्यास शरीरात 'हिस्टामिन'चे प्रमाण वाढते. यामुळे त्वचेवर पुरळ किंवा अॅलर्जिक प्रतिक्रिया वाढू शकतात.
  •  कोर्टिसोल (स्ट्रेस हार्मोन): कोर्टिसोलची कमी किंवा जास्त पातळी अॅलर्जिक प्रतिक्रिया वाढवू किंवा कमी करू शकते.
  •  थायरॉईड हार्मोन: हायपोथायरॉईडिझम किंवा हायपरथायरॉईडिझममुळे त्वचेच्या संवेदनशीलतेत बदल होतो, ज्यामुळे अॅलर्जीची तीव्रता बदलते.

अॅलर्जीची लक्षणे:

  •  त्वचेवर खाज, पुरळ, सूज येणे.
  •  खोकला, सतत शिंका येणे, नाक वाहणे.
  •  डोळ्यांची जळजळ होणे.
  •  श्वसनाचा त्रास होणे.
  •  अन्नाशी संबंधित प्रतिक्रिया, उलट्या, पोटदुखी.

 दीर्घकालीन दाह (इन्फ्लेमेशन): पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये अनेकदा 'क्रॉनिक लो-ग्रेड इन्फ्लेमेशन' आढळते. म्हणजेच शरीरात सतत सौम्य दाहाची अवस्था असते. ही अवस्था प्रतिकारशक्तीला कायम सतर्क ठेवते. परिणामी, शरीर धूळ, परागकण, सौंदर्यप्रसाधने किंवा काही अन्नपदार्थ यांना 'धोका' समजून तीव्र प्रतिक्रिया देते. हीच प्रतिक्रिया अॅलर्जीच्या स्वरूपात दिसून येते.

इन्सुलिन रेसिस्टन्स, 'गट' आरोग्य आणि अॅलर्जी: पीसीओएसमधील इन्सुलिन रेसिस्टन्स हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, दाह अधिक तीव्र होतो आणि पचनसंस्था व 'गट मायक्रोबायोम' बिघडतो. पचनसंस्थेचे आरोग्य बिघडल्यास शरीराची प्रतिकारशक्ती योग्य प्रकारे काम करत नाही. त्यामुळे अन्न असहिष्णुता (Food Intolerance), पोट फुगणे, अपचन किंवा दूध, ग्लूटेन व साखरेमुळे होणाऱ्या अॅलर्जीच्या प्रतिक्रिया वाढू शकतात.

 त्वचा आणि सौंदर्यप्रसाधने: पीसीओएसमध्ये वाढलेल्या अँड्रोजेन्समुळे त्वचेतील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. त्यामुळे त्वचा तेलकट व संवेदनशील बनते. अशा त्वचेवर मेकअप उत्पादने, हेअर डाय, परफ्युम किंवा केमिकलयुक्त क्रीम वापरल्यास 'कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस', एक्झिमा किंवा तीव्र खाज निर्माण होऊ शकते.

 मानसिक ताणतणावाचा दुहेरी परिणाम: पीसीओएसमुळे महिलांना मानसिक ताण, न्यूनगंड आणि आत्मविश्वास कमी होणे अशा समस्या भेडसावतात. सततचा ताण कोर्टिसोल हार्मोन वाढवतो, जो प्रतिकारशक्ती कमकुवत करतो. त्यामुळे अॅलर्जी अधिक तीव्र होते आणि पुन्हा ताण वाढतो असे एक दुष्टचक्र तयार होते.

 महिलांनी काय काळजी घ्यावी?

  •  'लो-ग्लायसेमिक इंडेक्स' असलेला संतुलित आहार घ्यावा.
  •  साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न (Processed Food) टाळावे.
  •  पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी फायबरयुक्त आहार घ्यावा.
  •  नियमित व्यायाम आणि वजन नियंत्रण ठेवावे.
  •  योग व ध्यानाद्वारे ताणतणाव कमी करावा.
  •  अॅलर्जीची लक्षणे सतत जाणवत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

पीसीओएस ही केवळ स्त्रीरोगाशी संबंधित समस्या नसून ती हार्मोन्स, प्रतिकारशक्ती, पचनसंस्था आणि मानसिक आरोग्य यांच्याशी निगडित अवस्था आहे. योग्य जीवनशैली आणि वैद्यकीय मार्गदर्शनाने यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.


- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर