२०१७ साली विधानसभेतील प्रश्न सार्वजनिक केल्याचा होता आरोप

पणजी : वीज खात्याचे तत्कालीन अभियंते काशीनाथ शेट्ये यांच्याविरोधात विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाबाबत चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी शेट्ये यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यासाठी प्रथमदर्शनी कोणतेही पुरावे नाहीत, असे निरीक्षण नोंदवून पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने काशीनाथ शेट्ये यांना चोरीच्या आरोपातून मुक्त केले. याबाबतचा आदेश न्या. मनीषा पाटकर उर्फ नार्वेकर यांनी दिला.
तत्कालीन वीज मंत्री नीलेश काब्राल यांनी ७ जुलै २०१७ रोजी सामाजिक कार्यकर्ता तथा वीज अभियंते काशिनाथ शेट्ये यांच्याविरोधात विधानसभेत प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाची प्रत शेट्ये यांनी सोशल मीडियावर प्रसारित करून सार्वजनिक केली, असा दावा करून काब्राल यांनी १३ जुलै २०१७ रोजी विधानसभेत शेट्ये यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला होता. तसेच या प्रकरणी काब्राल यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून तत्कालीन सभापती प्रमोद सावंत यांनी १४ जुलै २०१७ रोजी माजी मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांना माहिती देऊन चौकशी करण्याची सूचना केली. तसेच अहवाल सादर करण्यास सांगितले होते. मुख्य सचिव शर्मा यांनी माजी पोलीस महासंचालक डाॅ. मुक्तेश चंदर यांना चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार, चंदर यांनी गुन्हा शाखेचे तत्कालीन अधीक्षक कार्तिक कश्यप यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्याची दखल घेऊन कश्यप यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वेश कर्पे यांना गुन्हा दाखल करून २४ तासांत अहवाल सादर करण्याचा निर्देश दिला होता.
दरम्यान, निरीक्षक कर्पे यांनी १४ जुलै २०१७ रोजी शेट्येंच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी गुन्हा शाखेने तपास पूर्ण करून १९ फेब्रुवारी २०१९ रोजी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, त्यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी न करता गुन्हा दाखल केल्याचा दावा शेट्ये यांनी केला. तसेच मूळ कागदपत्रे सदैव विधानसभेच्या ताब्यात आहेत.
या प्रकरणी न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवून काशीनाथ शेट्ये यांना विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाबाबत चोरीच्या आरोपातून सुटका केली आहे.
खोटा गुन्हा दाखल केल्याची माहिती
तक्रारदाराने वैयक्तिक वैरभावनेने खोटा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय तक्रारीत चोरलेल्या मालमत्तेचा किंवा दस्तावेजाचा उल्लेखच केला नाही. तत्कालीन आमदाराने स्वतः तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे तो निर्दोष असल्याचा दावा करून शेट्ये यांनी न्यायालयात आरोपातून सुटका करण्याचा अर्ज सादर केला.