३६ कोटींचे वार्षिक शुल्क थकविल्यामुळे जमिनीवरील दोन कॅसिनो बंद करण्याचे आदेश

अंमलबजावणी करण्याचे पोलीस महासंचालकांना निर्देश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th December, 12:42 am
३६ कोटींचे वार्षिक शुल्क थकविल्यामुळे जमिनीवरील दोन कॅसिनो बंद करण्याचे आदेश

पणजी : सरकारने तब्बल ३६ कोटी रुपयांच्या वार्षिक आवर्ती शुल्काची थकबाकी न भरल्यामुळे दोन जमिनीवरील कॅसिनोंना तत्काळ बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. हा आदेश गृह खात्याचे अवर सचिव मंथन मनोज नाईक यांनी दिला असून, पोलीस महासंचालकांना बंदीची अंमलबजावणी केल्यानंतर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हडफडे येथील बिग बी लेझरएलएलपी (Big B LeisureLLP) आणि कळंगुट येथील माचोस एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड (machos entertainment pvt ltd) यांचा यात समावेश आहे.

जारी करण्यात आदेशानुसार, बिग बी लेझरएलएलपी कंपनी हडफडे येथील रिओ रिझोर्टमध्ये कॅसिनो चालवत आहे. या कंपनीकडून १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या वर्षाचे ३ कोटी रुपये तर १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या वर्षाचे ११ कोटी रुपये मिळून १४ कोटी रुपयांची वार्षिक आवर्ती शुल्काची थकबाकी आहे. ही थकबाकी कारणे दाखवा नोटीस बजावून जमा केली नसल्यामुळे गृह खात्याने कॅसिनो तत्काळ बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. तसेच वरील थकबाकी आणि त्यावर १८ टक्के व्याजासह सात दिवसांत जमा करण्याचा आदेश जारी करण्यात आला.

कळंगुट येथील माचोस एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून कॅसिनो सुरू आहे. या कंपनीकडून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या वर्षाचे २२ कोटी रुपये वार्षिक आवर्ती शुल्काची थकबाकी आहे. ही थकबाकी कारणे दाखवा नोटीस बजावून जमा केली नसल्यामुळे गृह खात्याने तत्काळ कॅसिनो बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. तसेच वरील थकबाकी आणि त्यावर १८ टक्के व्याजासह सात दिवसांत जमा करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, या संदर्भात पोलीस महासंचालकांना आदेशाची अंमलबजावणी केल्यानंतर कृती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.