आग्नेय आशिया पुन्हा युद्धाच्या ज्वाळांत होरपळणार?

Story: विश्वरंग - कंबोडिया |
10th December, 12:32 am
आग्नेय आशिया पुन्हा युद्धाच्या ज्वाळांत होरपळणार?

ग्लोबल पातळीवर शांततेचे गोडवे गात असताना आग्नेय आशियात मात्र थायलंड-कंबोडिया सीमेवर पुन्हा युद्धाचा भडका उडाला. ८ डिसेंबर रोजी पहाटे थायलंडने कंबोडियाच्या सीमेत केलेल्या हवाई हल्ल्याने संपूर्ण प्रदेश दणाणून गेला. काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने झालेला शस्त्रसंधी करार आता केवळ कागदावर उरला का, असा प्रश्न उभा राहिला.

पहाटे थायलंडच्या लढाऊ विमानांनी कंबोडियाच्या लष्करी तळांवर अचूक बॉम्बहल्ले चढवले. थायलंडने दावा केला की कंबोडियाच्या गोळीबारात एक जवान मारला गेला, चार जखमी झाले; त्याच प्रत्युत्तरात ही कारवाई केली. कंबोडियाने मात्र हा 'अनाहूत आक्रमक हल्ला' असल्याचा आरोप करत तीव्र निषेध नोंदवला. त्यांच्या माहितीनुसार चार नागरिक मरण पावले आणि अनेक जखमी झाले. दोन्ही देश शस्त्रसंधीचे उल्लंघन एकमेकांवर ढकलत असल्याने तणाव आणखी वाढला.

या संघर्षाची पार्श्वभूमी खोल आहे. जुलै २०२५ मधील रक्तरंजित संघर्षानंतर ट्रम्प आणि मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे ऑक्टोबरमध्ये शांतता करार झाला होता. पण नोव्हेंबरमध्ये सीमेवर पेरलेल्या सुरुंगात थायलंडचा सैनिक गंभीर जखमी झाल्याने विश्वासाला धक्का बसला आणि करार ढवळू लागला. आता झालेल्या हवाई हल्ल्याने तो जवळजवळ कोलमडलाच आहे.

थायलंडच्या उबोन रत्चाथानी, सिसाकेट तसेच कंबोडियाच्या प्रीह विहार भागातून हजारो नागरिकांनी पलायन सुरू केले आहे. जवळपास ३.८५ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश दिल्याचे थायलंडचे अधिकारी सांगतात. घराच्या ओलाव्यासह असुरक्षिततेची भीती घेऊन बाहेर पडणाऱ्यांचे हाल पाहून मन सुन्न होते.

कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांनी थायलंडने "रेड लाईन" ओलांडल्याचा आरोप करत परिस्थिती आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली. या वादाच्या मुळाशी शंभर वर्षांपूर्वीची सीमा - नकाशांची संदिग्धता आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील प्रीह विहार मंदिराचा वाद आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मंदिर कंबोडियाचे असल्याचे म्हटले तरी प्रवेशमार्ग थायलंडच्या ताब्यात आणि हा ४.६ चौरस किमीचा भूभाग दोन्ही देशांसाठी अस्मितेचा प्रश्न ठरला आहे.

आता मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी संयमाचे आवाहन केले आहे. मात्र तणाव वाढतच राहिला, तर त्याचे परिणाम केवळ लष्करी नव्हे तर आर्थिक आणि मानवी संकटात रूपांतरित होतील. शांततेच्या आशेवर प्रत्येक गोळी नवा घाव करत आहे; आणि जग वाट पाहत आहे हा वणवा विझवला जाणार की आग्नेय आशिया पुन्हा एकदा युद्धाच्या ज्वाळांत होरपळणार?

- सचिन दळवी