मनुपेक्षा मेकॉले चांगला !

भारतीय शिक्षणातील मागासलेपणाला केवळ मेकॉले कारणीभूत नव्हता. त्याची मुळं मनुस्मृतीच्या चार हजार वर्षांच्या शिक्षणबंदीमध्ये दडलेली आहेत. ब्रिटिशांनी शोषणासोबतच आधुनिकतेची दारे उघडली. आजच्या शैक्षणिक धोरणांत मात्र पुन्हा शिक्षणबंदीची सावली दिसू लागली आहे.

Story: विचारचक्र |
4 hours ago
मनुपेक्षा मेकॉले चांगला !

सत्तेच्या मदाने विद्याबंदी केली। शुद्राती मानिली। बंदी सदा॥

मनू तो जळाला, इंग्रजी वा आली। ज्ञानाची माऊली। पान्हा पाजी॥

- महात्मा फुले

अलीकडेच, ‌भारतीयांच्या मानसिक गुलामगिरीसाठी ब्रिटिशांना व मेकॉलेला जबाबदार धरण्यात आले आहे. या मानसिक गुलामगिरीतून पुढील १० वर्षांत मुक्त होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारताची गौरवशाली शिक्षण परंपरा मेकॉलेने नष्ट केली आहे व आपण आपली भारतीय थोर शिक्षण व ज्ञान परंपरा विसरलो आहोत. या मानसिक मुक्तीसाठी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०‌’ तयार केले आहे‌. असे अनेक विचार मांडण्यात आले आहेत. भारतात जातीव्यवस्था मोगलांच्या राजवटीत मुसलमानांनी निर्माण केली आहे असा नवा इतिहास लिहिला जात आहे, तर भारताच्या शैक्षणिक व ज्ञानपरंपरेला ब्रिटिश व मेकॉलेने उद्ध्वस्त केले, असे म्हटले जात आहे.

ब्रिटिश वसाहत काळात मेकॉलेला शिक्षणामधून काळ्या रंगाचे, भारतीय वंशाचे पण विचाराने ब्रिटिश असे भारतीय कारकून निर्माण करायचे होते, हे खरे आहे! मेकॉलेला ब्रिटिश साम्राज्यवादाचे हितसंबंध राखणारे, स्वतंत्र विचार न करणारे, मानसिक गुलाम हवे होते हे १८३५ च्या मेकॉलेच्या ‘मिनिट्स‌’मधून दिसून येते. पण हे अर्धसत्य आहे. मेकॉलेच्या आधी भारतात मानसिक गुलामगिरी निर्माण केली जात नव्हती व भारतीय शिक्षण प्रणाली थोर होती हे समजणे व पसरवणे हा ‌‘कुतर्क‌’ आहे.

भारतात मानसिक गुलामगिरी निर्माण करण्याचा मनुस्मृतीचा, चातुर्वर्ण्याचा चार हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यात मेकॉलेचा इतिहास फक्त २०० वर्षांचा आहे; पण याच काळात ब्रिटिशांच्या व मिशनऱ्यांच्या शाळांमधून‌ ‘स्त्रीशुद्रातिशुद्रांना‌’ भारतात बुद्ध कालखंडानंतर शिक्षणाची संधी प्राप्त झाली.

भारताच्या शिक्षणाचा इतिहास हा शिक्षणबंदी, शिक्षणमुक्ती, परत शिक्षण बंदी असा वळणावळणाचा आहे. चातुर्वर्ण्य परंपरेत ब्राह्मणांना व नंतर काही मर्यादेत क्षत्रियांनाच शिक्षणाचा जन्मजात अधिकार होता. स्त्रीशूद्रातिशूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. गुरुकुलात ब्राह्मणेतरांना प्रवेश नव्हता. शिक्षण म्हणजे प्रामुख्याने धर्मग्रंथांचे पठण एवढाच अर्थ अभिप्रेत होता. त्यामुळे संस्कृत ही ज्ञानभाषा होती. ही ज्ञानभाषा शिकण्याचा अधिकार वरच्या जातींना होता.

या शिक्षण परंपरेत हाताने केलेल्या कामाला, कौशल्याला ज्ञान म्हणून मान्यता नव्हती. त्यामुळे शेतकरी, सुतार, लोहार, कुंभार इत्यादींच्या कार्यकौशल्याला प्रतिष्ठा व मान्यताच भारतात नव्हती. त्यामुळे अजिंठा, वेरूळ, भव्य देवालय, अद्वितीय स्थापत्य कलेचे नमुने उभे करणाऱ्या कारागिरांची नोंद, उल्लेख भारतात फारसे दिसत नाहीत. कारण ज्ञान व श्रम यात भारतीय शिक्षण परंपरेने फारकत केली आहे. धर्मग्रंथांचे पठण म्हणजे ज्ञान व ते श्रेष्ठ तर हाताने केलेली कामे कनिष्ठ हा विचार भारतात शिक्षणाने पसरवला होता व आहे. म्हणून भारतात १८-१९ व्या शतकात औद्योगिक क्रांती झाली नाही. या व्यवस्थेला धक्के चार्वाक, गौतम बुद्ध, महावीरांनी दिले. भारतात शिक्षण ‘मुक्त‌’ झाले. शिक्षण इहवादी, स्त्री-पुरुष समतेचे, समान संधीचे झाले. शिक्षणमुक्तीच्या काळात भारतात अनेक शास्त्रांची प्रगती झाली. पण पुढे ही शास्त्रे भारतात विकसित न होता युरोपात १८ व्या, १९ व्या शतकात विकसित झाली. ज्ञान इतरांना द्यायचे नाही ही भारतीय परंपरा असल्याने ज्ञानात भर पडली नाही. ज्ञानाचे डबके झाले व ज्ञानवृद्धी खुंटली. नंतरच्या काळात प्रतिक्रांती होऊन चातुर्वर्ण्याचा प्रभाव वाढला व शिक्षणबंदीचा कालखंड सुरू झाला. मोगलांच्या १००० वर्षांच्या कालखंडात या शिक्षण पद्धतीला धक्के बसले नाहीत व गुरुकुल परंपरा अबाधित राहिली. भारतातील या शिक्षण परंपरेला काही अपवाद निश्चित आहेत; पण अपवादाने नियम बदलत नाही. चातुर्वर्ण्याचा प्रभाव भारतीय समाजावर चार हजार वर्षे राहिला हे वास्तव आहे.

भारतीय परंपरेला, विचाराला ब्रिटिश कालखंडात मोठा धक्का बसला. ब्रिटिश केवळ एकटे आले नाहीत तर ते आधुनिक विज्ञान, आधुनिक तत्त्वज्ञान, आधुनिक मूल्य घेऊन भारतात आले. ब्रिटिशांच्या संपर्कामुळे महात्मा फुले यांनी थॉमस पेनचे ‘राइट्स ऑफ मॅन‌’ हे पुस्तक वाचले. सर्व माणसे जन्मतः समान असतात व सगळ्यांना समान अधिकार असतात हा धक्का देणारा विचार फुले यांनी मनुस्मृतीत मांडला. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी व ब्रिटिश सरकारने भारतातील सर्व जाती-धर्माच्या मुला-मुलींसाठी शाळा काढल्या व शिक्षण सर्वांना मुक्त केले. ब्रिटिशांनी शिक्षणाचा गाभा आधुनिक केला. गणित, भूगोल, इतिहास, रसायनशास्त्र, इंग्रजी, भाषा वगैरे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट झाले. भारतात आधुनिकतेची पहाट ब्रिटिशांमुळे झाली हे वास्तव आहे. ब्रिटिश शिक्षणाचा परिणाम म्हणूनच गुलामगिरी, ब्राह्मणांची कसब, शेतकऱ्यांचा आसूड यातून स्त्रीशुद्रातिशूद्रांच्या शतकानुशतकाच्या धार्मिक, सामाजिक व आर्थिक गुलामगिरीची कठोर चिकित्सा केली व सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली. ब्रिटिश भारतात आलेच नसते, तर भारत आजही अधिकृतपणे ‘मनुस्मृती‌’चा गुलाम राहिला असता व स्त्रियांना ‘सती‌’प्रथेचा बळी केले गेले असते.

ब्रिटिश भारतात आले ते भारतीयांचा उद्धार करण्यासाठी नव्हे तर आर्थिक शोषणासाठीच आले होते. पण त्यांच्या संपर्कातून भारतीयांना जो फायदा झाला तोसुद्धा मोठा आहे. ‘मनुस्मृती‌’चा कायदा जाऊन समतेवर आधारित ‘भारतीय संविधान‌’ निर्माण झाले हे ब्रिटिश व मेकॉलेच्या योगदानाचे फळ आहे. वाईटातून चांगले निघते ते हे असे. त्यामुळे भारतात आलेल्या मानसिक गुलामगिरीला मेकॉलेपेक्षा जास्त मनू जबाबदार आहे हे म्हणणे योग्य होईल. मेकॉलेने मनूची गुलामगिरी पुष्कळ सैल केली; पण ती ब्रिटिशांनी पूर्णपणे नष्ट केली, असे महात्मा फुले म्हणत नाहीत. म्हणून फुले यांनी हंटर कमिशनसमोरची साक्ष महत्त्वाची आहे. मेकॉलेच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्तीसाठी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ आणले आहे असे म्हटले गेले आहे. शैक्षणिक धोरणात ‘सर्वांसाठी शिक्षण‌’ आदी वाक्प‍प्रचार वापरले असले तरी या धोरणाचा छुपा अजेंडा ‘शिक्षण बंदीचा‌’ आहे. शिक्षण ‘कास्ट‌’वरून‌ ‘कॉस्ट‌’वर आणले आहे. ‘धनदांडग्यांसाठी शिक्षण‌’ व इतरांना ‘शाळा बंदी‌’ असे हे धोरण आहे. प्रत्यक्षात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०‌’ हे सुटा-बुटावर जानवे घालण्याचा प्रकार आहे. ब्रिटिश कालखंडाच्या फायदा-तोट्याचा ताळेबंद मांडला तर ब्रिटिशांमुळे, मेकॉलेमुळे शिक्षण सर्वांसाठी हे मूल्य भारतात आले. ‘स्त्रीशूद्रातिशूद्रांना‌’ शिक्षणाची द्वारे उघडली गेली. मनुस्मृतीला छेद देणारी आधुनिक मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता, लोकशाही, विज्ञाननिष्ठा, न्याय वगैरे भारतात आले. त्यामुळेच भारत प्रगत होत आहे. म्हणून ब्रिटिश कालखंडात मनूच्या गुलामगिरीतून भारतीय समाज मुक्त होऊन काळझोपेतून जागा झाला हे म्हणणे योग्य होईल. मेकॉले व मनू सख्खे भाऊ, पण मनुपेक्षा मेकॉले बरा असेच म्हणावे लागेल! दोघांच्याही गुलामगिरीतून मुक्त होण्याचा मार्ग महात्मा गांधी यांनी ‘बुनियादी तालिम‌’मध्ये दाखवला आहे.


- शरद जावडेकर

(लेखक अखिल भारतीय समाजवादी शिक्षणहक्क सभेचे कार्याध्यक्ष आहेत.)