२०२७ वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघासमोर आव्हाने

Story: क्रीडारंग - क्रिकेट |
4 hours ago
२०२७ वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघासमोर आव्हाने

भारताची क्रिकेट टीम सध्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने संघ नियोजन करत आहे. विश्वचषकाला अजून दोन वर्षे बाकी असली तरी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दीर्घकालीन नियोजन सुरू केले आहे. आगामी स्पर्धेची तयारी, संघात योग्य खेळाडूंची निवड आणि संभाव्य अडथळ्यांची ओळख याकडे टीम मॅनेजमेंट बारकाईने लक्ष देत आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरोधात नुकत्याच संपलेल्या वनडे मालिकांनी मात्र अनेक प्रश्न उभे केले असून त्यावर लगेच उपाययोजना करण्याची गरज आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी पुन्हा एकदा आपली किंमत सिद्ध केली. गेल्या काही मालिकांमध्ये त्यांनी केवळ स्थिरतेचे दर्शन घडवले नाही, तर पुढेही हे दोन दिग्गजच टीमच्या मुख्य कणा असतील, हे स्पष्ट केले आहे. यामुळेच, भविष्यात या दोघांच्या जागी कोणताही युवा खेळाडू सहज बसू शकेल, असा दावा करता येत नाही. वरिष्ठांचा हा प्रभाव टीमसाठी चांगला असला तरी आगामी वर्ल्डकप लक्षात घेता युवा खेळाडूंनी त्यांचा वारसा टिकवण्याची तयारी दाखवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांनी भारतीय संघाच्या एक महत्त्वाच्या कमकुवत दुव्याकडे लक्ष वेधले. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडून अनुभवी आणि सामन्याचा कल बदलण्यास सक्षम अशा खेळीची अपेक्षा होती. मात्र दोघेही अलीकडील सामन्यांत तितके प्रभावी ठरले नाहीत.

भारतीय संघाला ६ ते ७ क्रमांकावर असा खेळाडू हवा, जो संकटातून संघाला वर काढू शकेल. इजा झालेल्या श्रेयस अय्यरच्या जागी चौथ्या क्रमांकावर ऋतुराजला उतरवण्यात आले. तो प्रयोग काही प्रमाणात यशस्वीही झाला, पण संघ व्यवस्थापनाने सतत क्रम बदलण्याची पद्धत अवलंबली आहे. यामुळे खेळाडूंची मानसिकता ढासाळते आणि याचाच फटका बसतो. भारताकडे २०२७ वर्ल्डकपपूर्वी फक्त १८ वनडे सामने शिल्लक आहेत. विश्वचषकासाठी एवढ्या कमी सामन्यांत योग्य संयोजन, योग्य खेळाडू आणि योग्य क्रम शोधणे हे मोठे आव्हान आहे. चालू वर्षात भारताचा एकही वनडे सामना बाकी नाही. पुढील मालिका नव्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहेत. यामुळे २०२५ आणि २०२६ मधील मर्यादित संधींचा अधिकाधिक फायदा घेऊन संघाला अंतिम स्वरूप देणे अत्यावश्यक आहे. भारताकडे प्रचंड प्रतिभावान युवा खेळाडू आहेत. तिलक वर्मा, यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, रिंकू सिंग, तसेच भारताची बेंच स्ट्रेन्थही मजबूत आहे. पण त्यांच्या कौशल्याला योग्य दिशा देणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थिरता आणणे हे सर्वस्वी टीम मॅनेजमेंटवर अवलंबून आहे.

- प्रवीण साठे