मुख्यमंत्र्यांनी फोडला जिल्हा पंचायत प्रचाराचा नारळ : आज रात्रीपर्यंत भाजपची दुसरी यादी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
मुख्यमंत्र्यांनी फोडला जिल्हा पंचायत प्रचाराचा नारळ : आज रात्रीपर्यंत भाजपची दुसरी यादी

पणजी : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवारांची दुसरी यादी आज रात्रीपर्यंत जाहीर केली जाईल. ज्या मतदारसंघांत उमेदवारी जाहीर झाली आहे, त्या मतदारसंघांत प्रचाराला सुरुवात झाली आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP Goa State President) दामू नाईक (Damu Naik) यांनी  दिली. 

उत्तर गोवा व दक्षिण गोवा मिळून भारतीय जनता पक्षाने १९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तीन मतदारसंघ मगोला सोडण्याचा निर्णय झाला आहे. उर्व‌रित मतदारसंघांचे उमेदवार आज रात्रीपर्यंत जाहीर केले जाणार आहेत. दुसऱ्या यादीतील बहुतांश उमेदवार निश्चित झाले असून काही उमेदवारांबाबत चर्चा होईल व त्यानंतर यादी जाहीर केली जाईल, असे दामू नाईक म्हणाले.

दरम्यान, पाळी मतदारसंघात न्हावेली येथे श्री लक्ष्मीनारायण देवस्थानात आशीर्वाद घेऊन कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रचाराचा शुभारंभ केला. भाजपने पाळी मतदारसंघात सुंदर नाईक यांना उमेदवारी दिली आहे. पाळी मतदारसंघासह दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचा विजय निश्चित आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

दुसऱ्या दिवशी एकच उमेदवारी अर्ज

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी फक्त एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला. वेळ्ळी मतदारसंघात अपक्ष उमेदवार जॉन बेडा पेद्रो पेरेरा यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. पहिल्या दिवशी सोमवारी एकही अर्ज दाखल झाला नव्हता.



हेही वाचा