अंधारामुळे अपघात वाढले; नुवे महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दोन म्हशी जखमी

पोलीस आणि सामाजिक संस्थांकडून जीवदान. उपचारांसाठी गोशाळेत हलवले

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
31 mins ago
अंधारामुळे अपघात वाढले; नुवे महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दोन म्हशी जखमी

मडगाव: नुवे येथील राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळी भरधाव आलेल्या एका मोठ्या कंटेनरच्या धडकेत दोन म्हशी जखमी झाल्याची घटना घडली. यातील एक म्हैस गाभण (Pregnant) असल्याचे आढळून आले आहे. मायणा कुडतरी पोलीस, बजरंग दल आणि प्राणी कल्याण संस्थांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे या दोन्ही म्हशींना जीवदान मिळाले असून, त्यांना पुढील देखभालीसाठी ध्यान फाउंडेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अपघाताची कारणे

नुवे येथील महामार्गावर काही ठिकाणी पथदीपे (रस्त्यावरील दिवे) बंदावस्थेत आहेत, तसेच सिग्नल यंत्रणाही व्यवस्थित कार्यरत नाही. रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनांच्या चालकांना रस्त्यावर आलेल्या प्राण्यांचा अंदाज येत नाही आणि अशा अपघातांची शक्यता वाढते. या अपघातात जखमी झालेल्या म्हशींना टॅगिंग केलेले नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

हा अपघात होताच, बजरंग दलाशी संलग्न एका युवकाने तत्काळ मायणा कुडतरी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस, दक्षिण गोवा प्राणी क्रूरता प्रतिबंधक समितीचे (DSPCA) अधिकारी राज प्रतीक आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी म्हशींना रस्त्यावरून बाजूला केले व त्यांना पाणी पाजले.

म्हशींना गोशाळेत हलवले

उपचारानंतर, या दोन्ही म्हशींना ध्यान फाउंडेशन या संस्थेच्या गाडीतून पुढील सांभाळ आणि वैद्यकीय उपचारांसाठी गोशाळेत पाठवण्यात आले. यावेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावरील पथदीपांसह सिग्नल यंत्रणा तातडीने सुरळीत करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली आहे. तसेच, प्राण्यांच्या मालकांनीही आपल्या गुरांना रात्रीच्या वेळी अशाप्रकारे महामार्गावर मोकळे सोडू नये, असे कळकळीचे आवाहन पोलिसांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.

हेही वाचा