पणजीत घेतला आढावा : चित्ररथ मिरवणूक विशेष आकर्षण

इफ्फीच्या तयारीचा आढावा घेताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत इतर.
पणजी : यंदा इफ्फीचा उद्घाटन सोहळा पणजी येथील जुने गोमेकॉ परिसरात होणार आहे. येथेच रेड कार्पेटसह चित्रपट सृष्टीशी संबंधित चित्ररथ मिरवणूक होईल. पुढील चार ते पाच दिवसांत इफ्फी संबंधित सर्व तयारी पूर्ण होईल. तर १९ नोव्हेंबरपर्यंत मंच व एकूणच इव्हेंटची जागा तयार होईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. मंगळवारी त्यांनी गोवा मनोरंजन संस्था (ईसजी) परिसरात सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी ईसजीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, इफ्फीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. जुने गोमेकॉ परिसरात ५०० व्हीआयपी बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. तर सामान्य जनतेसाठी जुने गोमेकॉच्या समोर १५०० जणांसाठी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. इच्छुकांना पास घेणे आवश्यक आहे. मागील वर्षी आयोजकांनी तसेच केंद्रीय मंत्र्यांनी इफ्फी उद्घाटन सोहळा खुल्या आवारात घेण्यास सुचवले होते. त्यानुसारच यंदा जुने गोमेकॉ परिसर निवडण्यात आला आहे.
गोमंतकीयांनी शिगमो, कार्निव्हल मधील चित्ररथ पाहिले आहेत. मात्र, यंदा प्रथमच चित्रपट सृष्टीशी संबंधित चित्ररथ मिरवणूक पाहण्याचा अनुभव मिळेल. याशिवाय येथे रांगोळी, आकाशकंदील स्पर्धा, गोमंतकीय कला प्रदर्शन आदी पाहण्याची संधी देखील मिळणार आहे. इव्हेंटमुळे या परिसरात एक दिवस वाहतूक कोंडी झाली तरी गोमंतकीयांना यंदा एक चांगला इव्हेंट पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम साधारणपणे तीन तास चालणार आहे. यानंतर इफ्फीतील चित्रपटांचे प्रदर्शन होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्यात सतर्कता
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दिल्ली बॉम्बस्फोटाची चौकशी केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गोव्यालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. याशिवाय नेहमीप्रमाणे राज्यात सर्वत्र तपासणी सुरूच आहे.