गुरुनाथ नाईक यांना ‘उत्कृष्ट चेअरमन’ पुरस्कार जाहीर

गोवा राज्य सहकारी संघटनेचे पुरस्कार घोषित

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
गुरुनाथ नाईक यांना ‘उत्कृष्ट चेअरमन’ पुरस्कार जाहीर

पत्रकार परिषदेत माहिती देताना विजयकांत गावकर. सोबत देविदास जांभळे, हृदयनाथ नाईक आणि मशाल अडपईकर.

पणजी : गोवा राज्य सहकारी संघटनेचे पुरस्कार जाहीर झाले असून, द भंडारी मल्टीपर्पज सहकारी सोसायटी, पणजीचे चेअरमन गुरुनाथ नाईक यांना ‘उत्कृष्ट चेअरमन’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, फोंडा येथील दत्तात्रय नाईक यांना ‘उत्कृष्ट सहकारी’ आणि शिरोडा सहकारी दुग्ध व्यवसाय संस्था लिमिटेडचे विष्णू नाईक यांना ‘उत्कृष्ट सचिव’ हा पुरस्कार मिळाला आहे.
पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत गोवा राज्य सहकार संघटनेचे चेअरमन विजयकांत गावकर यांनी पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. यावेळी उपाध्यक्ष देविदास जांभळे, संचालक हृदयनाथ नाईक आणि मशाल अडपईकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अडपईकर यांनी सांगितले की, गोवा राज्य सहकारी संघटना दरवर्षी १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान सहकार सप्ताह साजरा करते. यावर्षी सात दिवसांच्या सहकार सप्ताहानिमित्त गोव्याच्या विविध भागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना सहकार मंत्री सुभाष शिरोडकर आणि त्या-त्या भागातील स्थानिक आमदार उपस्थित राहणार आहेत.
सप्ताहाचे उद्घाटन १४ नोव्हेंबर रोजी एनआयओ, दोनापावला येथे होणार आहे. तर २० नोव्हेंबर रोजी समारोप सोहळा होणार असून या दोन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. सहकार सप्ताहाच्या समारोप सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे सर्व पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत.
पुरस्कारप्राप्त उत्कृष्ट सहकारी संस्था
- उत्कृष्ट सोसायटी पुरस्कार : श्री कृष्ण विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, मार्शेल
- उत्कृष्ट सहकारी दुग्ध सोसायटी पुरस्कार : अभिनव सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्था मर्यादित, डिचोली
- उत्कृष्ट पगारदार नोकरांसाठीची सहकारी पतसंस्था : एसीजीएल बीबीडी कर्मचारी क्रेडिट सोसायटी लि., होंडा
- उत्कृष्ट अर्बन सहकारी सोसायटी : दिनदयाळ मल्टीपर्पज सहकारी सोसायटी, डिचोली
- उत्कृष्ट ग्राहक सहकारी सोसायटी : इस्ट केपे कन्झ्युमर सहकारी सोसायटी
- इतर उत्कृष्ट सोसायटी : मांडवी फिशरमेन मार्केटिंग सहकारी सोसायटी, बेती      

हेही वाचा