चित्रपट कलाकारांची मागणी : चित्रपट अनुदान योजनेचा निधी इफ्फीपूर्वी द्या

पत्रकार परिषदेत माहिती देताना लक्ष्मीकांत शेटगावकर. सोबत साईश पाणंदीकर व विशाल पै काकोडे.
पणजी : यंदाच्या इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कोकणी चित्रपट ‘आसेंसांव’ प्रदर्शित करणे, सिनेमाटोग्राफर कै. वैकुंठ यांच्या शताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम करणे तसेच गोवा चित्रपट अनुदान योजनेचा निधी इफ्फीपूर्वी गोमंतकीय निर्मात्यांना द्यावा, अशी मागणी चित्रपट कलाकारांनी केली. मंगळवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत लक्ष्मीकांत शेटगावकर, साईश पाणंदीकर व विशाल पै काकोडे यांनी या मागण्या केल्या.
यावेळी दिग्दर्शक लक्ष्मीकांत शेटगावकर यांनी राज्य सरकार व गोवा मनोरंजन संस्था (ईएसजी) यांच्यावर ‘गोवा फिल्म फायनान्स स्कीम’अंतर्गत निधीचे वितरण न केल्याबद्दल टीका केली. ते म्हणाले, सरकार प्रत्येक इफ्फीपूर्वी मोठमोठी आश्वासने देते, परंतु प्रत्यक्षात निधी वितरणात विलंब होतो. यामुळे अनेक गोमंतकीय चित्रपट अर्धवट अवस्थेत थांबतात. मागील नऊ वर्षे हा निधी मिळालेला नाही. यामुळे स्थानिक चित्रपट निर्माते निराश झाले आहेत.
विशाल पै काकोडे म्हणाले की, इफ्फीचा ब्रॅण्ड व्हॅल्यू आता कमी झाला आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची उपस्थिती आणि प्रायोजकांची संख्या घटत आहे. आपलेच गोमंतकीय चित्रपट व चित्रपट कलाकार यांचा सन्मान न करणारे राज्य जगाला काय दाखवणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इफ्फीकडे केवळ एक इव्हेंट म्हणून न पाहता स्थानिक चित्रपट कलाकारांना संधी देण्याचे एक माध्यम म्हणून पाहणे गरजेचे आहे.
‘एनएफडीसी’च्या निवड प्रक्रियेवर आक्षेप
साईश पै पाणंदीकर यांनी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) इफ्फीमधील निवड प्रक्रियेवर अन्यायकारक असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, ज्या ‘क्लावडिया’ चित्रपटाचे कुठेही प्रदर्शन झालेले नाही आणि जो भारतीय पॅनोरमा विभागात निवडला गेला नाही, तो केवळ ‘स्पेशल प्रेझेंटेशन’ म्हणून दाखवला जाणार आहे. याउलट, आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन पुरस्कार जिंकलेल्या कोकणी चित्रपट ‘आसेंसांव’ कडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.