सुदैवाने जीवितहानी नाही; वेगावर नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

पणजी: गोव्यातील दोनापावला मार्गावर भरधाव वेगात असलेल्या एका 'ब्रँड-न्यू' चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने ते वाहन दुभाजकाला धडकून पलटी झाले. हा अपघात बुधवारी घडला असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या चार दिवसांपूर्वीच खरेदी केलेल्या या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ते पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला पडले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
या अपघातात चालक आणि प्रवासी असे दोघेही किरकोळ जखमी झाले असून, त्यांना वेळीच मदत मिळाली. वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पलटी झालेले वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
दोनापावला मार्गावरील वळणांवर भरधाव वेगाने वाहन चालवणे आणि नियंत्रण सुटणे, अशा घटना यापूर्वीही घडल्या आहेत. या अपघातामुळे पुन्हा एकदा या मार्गावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.