पुढील वर्षभरात २९ हजार विद्यार्थ्यांना मिळणार उद्यमशीलतेचे प्रशिक्षण - मुख्यमंत्री


37 mins ago
पुढील वर्षभरात २९ हजार विद्यार्थ्यांना मिळणार उद्यमशीलतेचे प्रशिक्षण - मुख्यमंत्री

पणजी : उद्योग खात्यातर्फे मुख्यमंत्री (Chief Minister) स्वयंरोजगार योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे. यानुसार पुढील वर्षभरात २९ हजार विद्यार्थ्यांना उद्यमशीलतेचे प्रशिक्षण तसेच कमी व्याजदरात कर्ज देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी सांगितले.

बुधवारी पणजीत (Panjim, Goa) योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इडीआयआयचे संचालक सुनील शुक्ला, खात्याचे संचालक अश्विन चंद्रू, सचिव संतोष सुखदेव, बी. एस. पै आंगले उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पूर्वी गोव्यामध्ये (Goa) सर्व क्षेत्रात उद्यमशीलता होती. मात्र कालांतराने गोमंतकीयांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.

यामुळे गोव्याचे अन्य राज्यांवरील अवलंबित्व वाढले. स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी सर्व क्षेत्रात स्वावलंबी होणे आवश्यक आहे. यासाठीच आम्ही ही योजना नव्याने सुरू करत आहोत. याद्वारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आंत्रप्यूनर बनण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.

यासाठी गुजरात येथील इडीआयआय संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. ही संस्था तरुणांना उद्योग,  स्टार्ट अप क्षेत्रात आवश्यक असणारे ज्ञान देईल.

ते म्हणाले, राज्यातील तरुणांनी केवळ नोकरीचा विचार करू नये. याऐवजी त्यांनी नोकरी देणारे बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

सध्या तसेच भविष्यात देखील राज्यात नोकरी तसेच उद्योग क्षेत्रात अनेक संधी आहेत. स्थानिकांनी या संधी घेतल्या नाहीत तर बाहेरील लोक येऊन त्या घेतील.

योजनेद्वारे महिला उद्योजकांनाही विशेष सवलती देण्यात येणार आहेत. योजनेची अंमलबजावणी ईडीसीतर्फे केली जात आहे. आतापर्यंत सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

प्राध्यपकांना प्रशिक्षण

ईडीसीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एस. पै आंगले यांनी सांगितले की, योजनेअंतर्गत विविध महाविद्यालयातील २०० प्राध्यापकांना कौशल्य विकास व अन्य क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात ३५ प्राध्यापकांना गुजरात येथे सहा दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. प्रशिक्षित प्राध्यापक विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करू शकतील.


हेही वाचा