गोव्यात पुण्यातील पर्यटकांवरील खूनी हल्ला प्रकरण; तिन्ही बाऊन्सर्सवर आरोप निश्चितीचा आदेश

ऑक्टोबर २०२३ मध्ये आसगावच्या 'सोरो क्लब'मध्ये घडला होता प्रकार

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
3 hours ago
गोव्यात पुण्यातील पर्यटकांवरील खूनी हल्ला प्रकरण; तिन्ही बाऊन्सर्सवर आरोप निश्चितीचा आदेश

म्हापसा: आसगाव येथील 'सोरो क्लब' मध्ये ऑक्टोबर २०२३ मध्ये पुण्यातील पर्यटकांवर झालेल्या खूनी हल्ल्याप्रकरणी मोठा विकास झाला आहे. या प्रकरणातील तिन्ही संशयित आरोपी बाऊन्सर्सविरुद्ध मेरशी येथील उत्तर गोवा फास्ट ट्रॅक न्यायालयाने आरोप निश्चितीचा आदेश दिला आहे.

काय घडले होते नेमके?

ही धक्कादायक घटना ८ ऑक्टोबर २०२३ रोजी पहाटे ३.३० ते ४ च्या दरम्यान घडली होती. पुणे, महाराष्ट्रातून आलेले तीन युवक आणि एक युवती असा चार पर्यटकांचा गट या क्लबमध्ये उपस्थित होता. मिळालेल्या माहितीनुसार, या गटातील फिर्यादी नितेश खर्र हे क्लबमधील वॉशरूम वापरण्यासाठी जात असताना, क्लबच्या कर्मचाऱ्यांनी (बाऊन्सर्स) त्यांना अटकाव केला. या क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. वाद वाढताच नितेश यांचे सहकारी रुचीर गुप्ता, गौतमी नगरकर आणि आर्यन श्रीवास्तव हे मदतीसाठी धावले.

दारूच्या बाटलीने हल्ला

यावेळी संशयित बाऊन्सर्सनी पर्यटकांसोबत थेट हातघाई केली. यातील एका संशयिताने तर कहरच केला; त्याने फिर्यादी नितेश खर्र यांच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. या भीषण हल्ल्यात नितेश खर्र गंभीर जखमी झाले, तर त्यांचे मित्र आणि मैत्रिणही किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले.

बाऊन्सर्सवर आरोप निश्चिती

या प्रकरणातील संशयित आरोपी संजय श्रीमोहन पाल (वेर्ला-काणका), मंजूनाथ आला नाईक (मयडे) आणि हेस्टन जोकीम डिकॉस्ता (बस्तोडा) या तिन्ही बाऊन्सर्सना हणजूण पोलिसांनी भा.दं.सं.च्या कलम ३०७ (खूनी हल्ला) आणि ३२३ (मारहाण) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती.

पोलीस उपनिरीक्षक साहील वारंग यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. यावर सुनावणी करताना न्यायाधीश आरतीकुमारी नाईक यांच्या मेरशी येथील उत्तर गोवा फास्ट ट्रॅक न्यायालयाने तिन्ही आरोपींविरुद्ध आरोप निश्चितीचा आदेश दिला आहे. न्यायालयात सरकारी पक्षाकडून सरकारी वकील कॉलेमन रॉड्रिगज यांनी युक्तिवाद केला, तर आरोपींच्या वतीने ॲड. एम. उसगावकर आणि ॲड. ऐश्वर्या खोबरेकर व ॲड. सिमरन पोखरे यांनी युक्तिवाद केला.