फरार कामगारावर संशय : दुहेरी खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ

पणजी : साळगावात गुरुवारी सकाळी घडलेल्या दुहेरी खुनाच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मुड्डोवाडा-साळगाव भागात रिचर्ड डिमेलो (गिरी - बार्देश) याच्यासह अभिषेक गुप्ता (इंदोर, मध्य प्रदेश) यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, या दुहेरी हत्येत डिमेलो याचा फरार कामगार जगन्नाथ याच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
साळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाड्याच्या खोलीत रिचर्ड डिमेलो याचा कामगार जगन्नाथ राहत होता. जगन्नाथने खोलीच्या भाड्याचे पैसे न दिल्याने घर मालक जगन्नाथला फोन करत होता. त्यानंतर तो फोन उचलत नसल्यामुळे घर मालक विचारपूस करण्यासाठी खोलीजवळ गेला. त्यावेळी त्याला खिडकी उघडी असल्याची दिसली तसेच खोलीत रक्त दिसून आले. त्यानंतर त्याने साळगाव पोलीस स्थानक गाठून खुनाची माहिती दिली.
साळगाव पोलीस निरीक्षक मिलिंद भुईंबर याच्यासह इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दरवाजा उघडला असता, आतमध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत दोघांचा मृतदेह सापडले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता, रिचर्ड डिमेलो आणि अभिषेक गुप्ता या दोघांचा चाकूने वार करून खून केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या शवागारात ठेवले.
पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू, दारूच्या बाटल्या व इतर वस्तू जप्त केल्या. तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करून पुरावे गोळा करण्यात आले. प्राथमिक तपासात दोघांचा मृत्यू मध्यरात्रीपासून पहाटेच्या सुमारास झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग, तसेच संघर्षाचे चिन्हे आढळल्याने ही हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे पोलिसांनी संशय व्यक्त केला.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्या खोलीत राहणारा जगन्नाथ फरार असून पोलिसांनी त्याच्यावर संशय व्यक्त केला आहे. रिचर्ड डिमेलो हा साऊंड सिस्टमचा पुरवठा करणारा व्यावसायिक होता. तर जगन्नाथ त्याच्याकडे टेक्निशियन म्हणून कामाला होता. कामगार जगन्नाथ त्या खोलीत राहत होता. कधी कधी डिमेलोही तिथे येत जात होता. तसेच काही वेळी तो तिथेच वास्तव्य करत होता.
फरार कामगार जगन्नाथ याने मध्य प्रदेश येथील अभिषेक गुप्ता याला बुधवारी रात्री गोव्यात घेऊन आला होता. त्यावेळी रिचर्ड डिमेलोसह हे दोघे खोलीत दारू पिल्याचे पुरावे पोलिसांना सापडले. तसेच फरार कामगाराचा शोध पोलीस घेत असून तो सापडल्यानंतर खुनाचा उलगडा होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेनंतर साळगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही मृतदेह शवचिकित्सेसाठी गोवा मेडिकल कॉलेज (बांबोळी) येथे पाठविण्यात आले असून, शवचिकित्सा अहवाल आल्यानंतरच खुनाचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.