
पणजी: सराईत गुंड जेनिटो कार्दोज याच्यासह सचिन पाडगावकर आणि प्रसाद कुबल यांना २००९ साली शिरदोण येथे झालेल्या टोळीयुद्धाच्या प्रकरणात सुनावण्यात आलेली तीन वर्षांची सक्तमजुरी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. हा निकाल न्यायाधीश भारती डांगरे यांनी दिला. सध्या जेनिटो कार्दोज हा सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी तुरुंगात आहे.
नेमके काय आहे २००९ चे प्रकरण?
ही घटना १० मे २००९ रोजी शिरदोण समुद्रकिनाऱ्यावर घडली होती. जेनिटो कार्दोज तसेच त्याचे सहकारी महावीर नाडर, डोम्निक नाझारेथ, सचिन पाडगावकर आणि प्रसाद कुबल यांचा प्रतिस्पर्धी मिरांड टोळीशी जोरदार वाद झाला. यावेळी दोन्ही गटांतील सदस्यांनी एका शॅकजवळ एकमेकांवर काचेच्या बाटल्या आणि चाकूने हल्ला केला. या टोळीयुद्धात दुसऱ्या टोळीचे सदस्य संतोष कालेल आणि फ्रान्सिस मॅन्युएल डिसोझा ऊर्फ 'मिरांड' या दोघांचा मृत्यू झाला होता.
उच्च न्यायालयात आव्हान
या प्रकरणात जेनिटो कार्दोज तसेच इतरांवर खुनाचा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता. मात्र, म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवले आणि तीन वर्षांची सक्तमजुरी ठोठावली. न्यायालयाने हा खून पूर्वनियोजित नसून, त्वरित झालेल्या भांडणातून घडल्याचे निरीक्षण नोंदवले होते. या हल्ल्यात कार्दोजही जखमी झाला होता. त्याचे दोन सहकारी निर्दोष मुक्त झाले होते.
दरम्यान, सत्र न्यायालयाने सुनावलेल्या तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा गोवास्थित उच्च न्यायालयाने आज शुक्रवारच्या निर्णयात कायम ठेवली आहे. यामुळे जेनिटो कार्दोजच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.