
पणजी: भारत सरकारच्या टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदांच्या भरती धोरणात महत्त्वाचे बदल केले असून, गोव्यात या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आता कोकणी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भात टपाल विभागाने आज अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
नेमके काय आहेत नवे नियम?
टपाल खात्याने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, गोव्यातील पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत कोकणी किंवा मराठी यापैकी एक विषय शिकलेला असणे आवश्यक आहे. यामध्ये महत्त्वाचा बदल म्हणजे, ज्या उमेदवारांनी फक्त मराठी विषय शिकलेला आहे, त्यांना देखील कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
प्रमाणपत्राची अट
दहावीपर्यंत कोकणी विषय शिकलेला नसल्यास, उमेदवाराला कोकणी भाषेचे ज्ञान आहे की नाही, याची पडताळणी केली जाईल. यासाठी गोवा कोकणी अकादमी किंवा गोवा राज्य सरकारने या उद्देशासाठी अधिकृत केलेल्या कोणत्याही संस्थेचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्वागत
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी गोवा क्षेत्राचे टपाल सेवा संचालक रमेश पाटील यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ही माहिती 'X' (ट्विटर) समाजमाध्यमावर दिली. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, टपाल विभागाने गोव्यासाठी ग्रामीण डाक सेवक भरती नियमांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे भरती प्रक्रियेत गोमंतकीयांना प्राधान्य मिळेल. तसेच, राज्यातील स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी खुल्या होतील आणि राज्यात टपाल सेवेचे वितरण अधिक मजबूत होईल.