प्रतिनिधी। गोवन वार्ता
नागाळी-दोनापावला येथील उद्योजक जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्यावर १९ एप्रिल रोजी रात्री सशस्त्र दरोडा पडला होता. या घटनेला पाच महिने उलटूनही या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. सुमारे एक किलो सोने आणि २ लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी पळवली होती. आंतरराज्य टोळीचा वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तपासादरम्यान पोलिसांना तांत्रिक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून काही संशयितांचे धागेदोरे हाती लागले आहेत. आंतरराज्य टोळीचा हात असल्याचा संशय असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. उद्योजक जयप्रकाश धेंपो यांच्या बंगल्यावर १९ एप्रिल रोजी रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून त्याचा कान कापला होता. बंगल्यात प्रवेश करून त्यांनी वृद्ध दाम्पत्याला बेडरूममध्ये पलंगाला बांधून ठेवले होते. त्यानंतर घरातील दागिने व रोकड त्यांनी लुटली होती. दरोडेखोरांनी सीसीटीव्ही यंत्रणा नेली होती. २० एप्रिल रोजी सकाळी मोलकरीण बंगल्यावर पोहोचल्यानंतर ही गंभीर घटना उघडकीस आली होती.
योग्य माहितीअभावी तपासाची दिशा चुकली
पोलिसांनी तपासासाठी पाच पथके तयार केली होती. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञांकडूनही धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र तपासात अपेक्षित फायदा झाला नाही. प्राथमिक चौकशीत सुरक्षारक्षकाने दिलेल्या माहितीत विसंगती आढळली. इतरांच्या चौकशीतून दरोडेखोर पहाटे ५.३० च्या सुमारास बंगल्यातून बाहेर पडल्याचे समोर आले. घटनेचा कालावधी चुकीचा दिल्यामुळे तपासाची दिशा चुकली. त्यामुळे चोर राज्याबाहेर गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


