वास्कोतून दुचाकी चोरणारे कर्नाटकातील दोघे गजाआड

तीन दुचाकी जप्त : ४ दिवसांची कोठडी


08th October, 12:44 am
वास्कोतून दुचाकी चोरणारे कर्नाटकातील दोघे गजाआड

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : वास्को शहरातील वेगवेगळ्या भागांतून तीन दुचाकी चोरल्याप्रकरणी वास्को पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली आहे. वैभव रणदिवे (१९) आणि अझरन इक्बाल शेख (१८) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघेही संशयित मूळचे कर्नाटक राज्यातील असून सध्या सांकवाळ येथे वास्तव्यास आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबरपूर्वी या दोघांनी वास्कोतील वेगवेगळ्या सार्वजनिक पार्किंगमधून तीन दुचाकी चोरल्या होत्या. यामध्ये एक टीव्हीएस एनटॉर्क (क्र. जीए ०६ वाय ७७९०), एक राखाडी रंगाची अॅक्टिव्हा स्कूटर (क्र. जीए ०८ डब्ल्यू ७७०६) आणि नोंदणी क्रमांक नसलेली एक पांढऱ्या रंगाची अॅक्टिव्हा यांचा समावेश आहे. याप्रकरणी वास्को पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल हेमंतकुमार गोसावी यांनी तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीवरून, भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी सोमवारी दोन्ही संशयितांना अटक केली. त्यांना मंगळवारी वास्को येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली. पोलीस निरीक्षक वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल हेमंतकुमार गोसावी पुढील तपास करत आहेत. राज्यातील इतर वाहनचोरी प्रकरणांमध्ये या दोघांचा सहभाग आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.