बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा

६, ११ नोव्हेंबरला मतदान, १४ रोजी निकाल : ७ राज्यांतील ८ जागांवर पोटनिवडणुका जाहीर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th October, 05:47 pm
बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणूक २०२५ च्या तारखांची घोषणा करण्यात आली असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार. पहिल्या टप्प्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान होईल आणि १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घोषणेसोबतच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया ४० दिवसांत पूर्ण केली जाईल.

पहिला टप्पा: अधिसूचना १० ऑक्टोबर रोजी जारी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर, अर्जांची छाननी १८ ऑक्टोबर आणि अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर असेल. या टप्प्यात ६ नोव्हेंबर रोजी मतदान होईल.

दुसरा टप्पा: अधिसूचना १३ ऑक्टोबर रोजी जारी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर, अर्जांची छाननी २१ ऑक्टोबर आणि अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २३ ऑक्टोबर असेल. या टप्प्यात ११ नोव्हेंबर रोजी मतदान होईल.

७.४२ कोटी मतदार बजावणार हक्क

बिहारच्या सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर रोजी संपत आहे. राज्यातील प्रमुख सण असलेल्या छठ पूजेनंतर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी राजकीय पक्षांनी केली होती, जेणेकरून सणासाठी घरी परतलेले मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. राज्यात एकूण ७.४२ कोटी मतदार असून, त्यात ३.९२ कोटी पुरुष आणि ३.५० कोटी महिला मतदार आहेत. विशेष म्हणजे, १४ लाख मतदार यंदा पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.

निवडणुका पारदर्शक होणार : ज्ञानेश कुमार

या निवडणुका अत्यंत सुलभ, सोप्या आणि पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडतील, अशी ग्वाही ज्ञानेश कुमार यांनी दिली. कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेतली जाणार नाही आणि बनावट बातम्या व चुकीच्या प्रचारावर आयोग कठोर नजर ठेवेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, या निवडणुकीत १७ नवीन उपक्रम सुरू केले जात आहेत, जे बिहारपासून सुरू होऊन संपूर्ण देशात लागू केले जातील.

८ जागांसाठी पोटनिवडणुकाही जाहीर

१) बिहार निवडणुकीसोबतच निवडणूक आयोगाने ७ राज्यांतील ८ विधानसभा जागांवर पोटनिवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

२) या सर्व जागांसाठी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी मतदान होईल आणि १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.

३) या जागांमध्ये राजस्थानमधील अंटा, जम्मू-काश्मीरमधील बडगाम आणि नागरोटा, पंजाबमधील तरनतारन, झारखंडमधील घाटशिला, तेलंगणातील ज्युबिली हिल्स, मिझोराममधील डांपा आणि ओडिशातील नुआपाडा या मतदारसंघांचा समावेश आहे.

हेही वाचा