वार्का येथे कौटुंबिक वादातून दोन दुचाकी जाळल्या; पत्नीच्या तक्रारीनंतर पतीवर गुन्हा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
06th October, 05:21 pm
वार्का येथे कौटुंबिक वादातून दोन दुचाकी जाळल्या; पत्नीच्या तक्रारीनंतर पतीवर गुन्हा

मडगाव : वार्का येथील चर्चच्या मागील बाजूला राहणाऱ्या विनंती कोलकर यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या दोन दुचाकी आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी, विनंती कोलकर यांच्या तक्रारीनंतर कोलवा पोलिसांनी त्यांचे पती दामोदर कोलकर यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. दुचाकी जाळण्याचा हा प्रकार कौटुंबिक वादातून झाल्याचे समोर आले आहे.

विनंती कोलकर यांच्या मालकीची एक 'अ‍ॅक्टिवा' आणि त्यांच्या मुलाच्या मालकीची 'टीव्हीएस एन्टॉर्क' अशा दोन दुचाकींना रविवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास आग लागली. दोन्ही गाड्या घराबाहेर पार्क केलेल्या होत्या. आग लागल्याची माहिती मिळताच मडगाव अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. मात्र, त्यांची गाडी पोहोचण्यापूर्वीच स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिळवले होते. या घटनेत दोन्ही गाड्या जळाल्याने सुमारे २.२० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

विनंती कोलकर यांनी कोलवा पोलिसांत तक्रार नोंदवताना नमूद केले आहे की, त्यांचे पती दामोदर कोलकर यांनीच या दुचाकींना आग लावली आणि त्यांना धमकीही दिली होती. या तक्रारीनुसार, कोलवा पोलिसांनी संशयित दामोदर कोलकर यांच्याविरोधात धमकी देणे आणि मालमत्तेला आग लावणे या कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. हवालदार समीर मराठे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा