आज आशिया कप २०२५ चा अंतिम सामना
दुबई : टी २० आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी थरारक लढत होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. विशेषतः अभिषेक शर्मा याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.या सामन्याच्या पार्श्वभूमीवर मैदानावरील खेळ आणि मैदानाबाहेरील राजकीय वातावरण यामध्ये तणाव जाणवत आहे. भारताच्या कर्णधाराने टॉसवेळी आणि सामन्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्यामुळे वाद निर्माण झाला. पाकिस्तानच्या हारिस राऊफनेही अपमानास्पद इशारे करत प्रत्युत्तर दिले. यामुळे दोघांवर आयसीसीने ३० टक्के दंड ठोठावला आहे.
अभिषेक शर्माने आतापर्यंतच्या सहा सामन्यांत ३०९ धावा करत भारताच्या फलंदाजीचा भार एकहाती उचलला आहे. त्याचा स्ट्राइक रेट २०० पेक्षा अधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा आहे, ज्याने १४४ धावा केल्या आहेत. त्यामुळे अभिषेकवर खूप मोठी जबाबदारी आहे. जर तो अपयशी ठरला, तर भारताकडे ‘प्लॅन बी’ आहे का, हा मोठा प्रश्न आहे.सलमान अली आगा यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाची फलंदाजी अधिकच अस्थिर आहे. साहिबजादा फरहान वगळता इतर फलंदाज प्रभावी ठरलेले नाहीत. सईम अयूब चार वेळा शून्यावर बाद झाला आहे. भारताचे फिरकीपटू कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती पुन्हा एकदा निर्णायक ठरू शकतात.
हार्दिक पांड्या आणि अभिषेक शर्मा यांना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दुखापती झाल्या होत्या. पण गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कल यांनी सांगितले की अभिषेक ठीक आहे आणि हार्दिकची तपासणी केली जाईल.
आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आशिया कपची सुरुवात १९८४ मध्ये झाली होती आणि सध्या सुरू असलेला हा १७ वा हंगाम आहे. २०१६ आणि २०२२ मध्ये टी २० फॉरमॅटमध्ये आशिया कप खेळला गेला होता, आणि २०२५ हे या फॉरमॅटमधील तिसरी आवृत्ती आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत ५ वेळा असे फायनल सामने झाले आहेत, जेथे ५ किंवा त्याहून अधिक संघ सहभागी होते. त्यातील भारताने २ फायनल्स जिंकले: १९८५: बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियनशिप (मेलबर्न) भारताने पाकिस्तानला ८ गडी राखून हरवले, २००७ टी २० वर्ल्ड कप (जोहान्सबर्ग) भारताने पाकिस्तानला ५ धावांनी हरवले.
पाकिस्तानने ३ फायनल्स जिंकले १९८६ ऑस्ट्रल-आशिया कप (शारजाह) पाकिस्तानने भारताला १ गडी राखून हरवले. १९९४ ऑस्ट्रल-आशिया कप (शारजाह) पाकिस्तानने भारताला ३९ धावांनी हरवले. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी (द ओव्हल) पाकिस्तानने भारतावर मात केली.
२८ तारीख पुन्हा शुभ ठरणार का?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांमध्ये २८ तारखेचा एक खास योगायोग दिसून येतो. मागील दोन वेळा जेव्हा हे दोन संघ २८ तारखेला आमनेसामने आले, तेव्हा भारताने विजय मिळवला होता. २८ डिसेंबर २०१२ रोजी भारताने पाकिस्तानविरुद्ध टी-२० सामन्यात ११ धावांनी विजय मिळवला. २८ ऑगस्ट २०२२ रोजी आशिया कपमधील टी-२० सामन्यात भारताने पाकिस्तानला ४ गडी राखून पराभूत केले. या दोन्ही विजयांमुळे 28 तारीख भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक शुभ तारीख ठरली आहे. आता २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आशिया कप फायनलमध्ये भारत पुन्हा एकदा या तारखेच्या जादूला कायम ठेवू शकतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारताला विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी
भारत-पाकिस्तान सामना हा केवळ एक खेळ नसून, तो भावना, अभिमान आणि इतिहासाने भरलेला असतो. या आशिया कपमध्ये हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. याआधी ग्रुप स्टेज आणि सुपर-४ मध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे. त्यामुळे भारताकडे आता विजयाची हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे.
भारताचे लक्ष्य ९ वा आशिया कप
भारताने आतापर्यंत ८ वेळा आशिया कप जिंकला आहे. १९८४, १९८८, १९९०-९१, १९९५, २०१०, २०१६, २०१८ आणि २०२३. तर पाकिस्तानने फक्त २ वेळा हा किताब जिंकला आहे. २००० आणि २०१२. त्यामुळे भारताचे लक्ष्य ९ वा आशिया कप किताब आपल्या नावे करणे आणि पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये विजय मिळवून इतिहास रचणे असेल
अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस
भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप २०२५ चा अंतिम सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार त्या दिवशी दुबईमध्ये हवामान साफ राहण्याची शक्यता आहे. मात्र, काही कारणास्तव सामना २८ तारखेला पूर्ण न झाल्यास, तो रद्द केला जाणार नाही. २९ सप्टेंबर हा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. जर २८ तारखेला सामना पूर्ण न झाल्यास, उर्वरित सामना २९ तारखेला खेळवला जाईल. जर राखीव दिवसालाही सामना पूर्ण न होऊ शकला, तर भारत आणि पाकिस्तानला संयुक्त विजेते घोषित करण्यात येईल. सुदैवाने, दुबईमध्ये पावसाची किंवा वादळाची शक्यता फारच कमी असल्यामुळे राखीव दिवस वापरण्याची गरज भासण्याची शक्यता कमी आहे.
फायनल्सचा तपशीलवार इतिहास
वर्ष स्पर्धा ठिकाण निकाल
१९८५ वर्ल्ड चॅम्पियनशिप मेलबर्न भारत ८ गडी राखून विजयी
१९८६ ऑस्ट्रल-आशिया कप शारजाह पाकिस्तान १ गडी राखून विजयी
१९९४ ऑस्ट्रल-आशिया कप शारजाह पाकिस्तान ३९ धावांनी विजयी
२००७ टी २० वर्ल्ड कप जोहान्सबर्ग भारत ५ धावांनी विजयी
२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी द ओव्हल पाकिस्तान विजयी
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.
पाकिस्तान : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमां, हारिस राऊफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सईम अयूब, सलमान मिर्झा, शाहीन अफरीदी, सुफयान मोकिम.
आजचा सामना
भारत वि. पाकिस्तान
(आशिया कप २०२५ फायनल)
वेळ : रात्री ८ वा.
स्थळ : दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, दुबई
प्रक्षेपण : सोनी स्पाेट्र्स नेटवर्क, सोनी लिव्ह