भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने

आशिया कप २०२५ सुपर ४ : बुमराह, वरुण परतणार

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
21st September, 12:29 am
भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने

दुबई : यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया कपमध्ये शुक्रवारी भारत आणि ओमान यांच्यात गट टप्प्यातील शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने २१ धावांनी विजय मिळवला. ओमानने शेवटपर्यंत झुंज दिली आणि चाहत्यांची मने जिंकली. या विजयासह भारत गट-अ मध्ये अपराजित ठरला. भारताने तीनही सामने जिंकून एकूण ६ गुणांची कमाई केली. आता भारत थेट पाकिस्तानशी भिडणार आहे.
हा सामना रविवारी दुबई क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. गट टप्यात भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे सूर्यकुमार यादव अँड कंपनी पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. मात्र या महत्त्वाच्या लढतीपूर्वी भारताला धक्का बसला आहे, कारण अक्षर पटेल जखमी झाला आहेत.
अक्षर पटेल रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात खेळू शकतील की नाही, याबाबत शंका आहे. ओमानविरुद्ध अबुधाबीत खेळल्या गेलेल्या सामन्यात फील्डिंगदरम्यान त्यांना डोक्याला दुखापत झाली. ओमानच्या डावातील १५ व्या षटकात हम्माद मिर्झाचा एक कॅच झेलण्यासाठी अक्षर मिड-ऑफवरून धावत आला. पण शेवटच्या क्षणी चेंडू हातातून सुटला. पुन्हा प्रयत्न करताना तो खाली पडला आणि त्यांच्या डोक्याला जोराची धडक बसली. यानंतर फिजिओच्या मदतीने अक्षरला मैदानाबाहेर नेण्यात आले. त्या वेळी तो मान व डोक्याचा भाग धरून होता. उरलेल्या सामन्यात तो मैदानावर परतला नाहीत.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फील्डिंग कोच टी दिलीप यांनी सांगितले की, अक्षर ठीक आहेत. पण सामन्यांमधील अल्पावधीत होणारा बदल हा संघासाठी आव्हानात्मक ठरू शकतो. कारण पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीसाठी भारताकडे तयारीसाठी ४८ तासांपेक्षाही कमी वेळ आहे. जर अक्षर पटेल मैदानात उतरला नाही, तर टीम मॅनेजमेंटसमोर तीन फिरकीपटूंना खेळवण्याचे मोठे आव्हान उभे राहील. सध्या भारताकडे वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे दोन प्रमुख फिरकीपटू आहेत. तिसऱ्या फिरकीसाठी संघ व्यवस्थापनाला रियान पराग किंवा वॉशिंग्टन सुंदर या राखीव खेळाडूंपैकी एखाद्याला बोलवावे लागेल.
भारताचे दोन बदल
भारतीय संघात पाकिस्तानविरुद्ध दोन बदल पाहायला मिळू शकतात. ओमानविरुद्धच्या शेवटच्या ग्रुप सामन्यात अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांना संधी देण्यात आली होती. त्या वेळी जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्तीला विश्रांती देण्यात आली होती. पण पाकिस्तानविरुद्धच्या या मोठ्या सामन्यासाठी बुमराह आणि वरुणची पुनरागमन होण्याची शक्यता जास्त आहे.
जर पाकिस्तानविरुद्धच्या सुपर ४ सामन्यासाठी बुमराह आणि वरुणला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले गेले तर ते अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांची जागा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताची प्लेइंग इलेव्हन जवळपास तीच राहील जी ग्रुप स्टेजमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात होती.
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी सांभाळतील. सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर येईल, त्यानंतर तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल असतील. भारतीय गोलंदाजी आक्रमणात स्पेशालिस्ट फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव असतील, तर जसप्रीत बुमराह हा वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा एकमेव प्रमुख असेल. बुमराहला अष्टपैलू पांड्या आणि दुबे यांची साथ मिळेल. या संघासह भारत सुपर-४ मधील हायव्होल्टेज पाकिस्तान सामन्यासाठी मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानची क्रिकेट टीम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. २१ सप्टेंबरला होणाऱ्या या सामन्यापूर्वी पाकिस्तानने आपली अधिकृत पत्रकार परिषद रद्द केली आहे, ज्यामुळे संघातील अंतर्गत दबाव दिसून येतो. यापूर्वीही संघाने युएईविरुद्धच्या सामन्यापूर्वी आपली पत्रकार परिषद देखील रद्द केली होती.
संघात ‘मोटिव्हेशनल स्पीकर्स’ची एन्ट्री
गट टप्प्यात भारताविरुद्धच्या दारुण पराभवानंतर हा वाद सुरू झाला. भारताने पाकिस्तानला सात गडी राखून हरवले होते. त्याहूनही मोठा धक्का म्हणजे भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचा आत्मविश्वास आणि मनोबल खूपच कमी झाले. खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी टीम मॅनेजमेंटला अगदी मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. राहील यांना बोलवावे लागले. संघाची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की त्यांना स्पर्धेच्या मध्यात मोटिव्हेशनल स्पीकर्सची आवश्यकता लागली.
मैदानाबाहेरचे वादही चव्हाट्यावर
भारत-पाकिस्तान सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन टाळल्याने पाकिस्तानी खेळाडूंनी पोस्ट-मॅच प्रेझेंटेशनलाही बहिष्कार घातला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सामन्याचे रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या विरोधात तक्रार केली. भारतीय खेळाडूंवर कारवाई न केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संतापले आणि स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर यूएईविरुद्धचा सामना मुद्दाम उशिरा सुरू करून त्यांनी आपला विरोध नोंदवला.
आयसीसीची कारवाई शक्य
वादाने शिखर तेव्हा गाठले, जेव्हा पाकिस्तानने पायक्रॉफ्ट यांच्यासोबत झालेल्या मिटिंगचे गुपचूप रेकॉर्डिंग करून ऑनलाईन टाकली. ही मिटिंग प्लेयर्स अँड मॅच ऑफिशियल्स एरिया (पीएमओए) मध्ये झाली होती, जेथे मोबाईल वा कॅमेरे नेण्यास बंदी असते. त्यामुळे आता आयसीसी पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईचा विचार करत आहे.
टीम इंडियाचा संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
आजचा सामना
भारत वि. पाकिस्तान
स्थळ : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
वेळ : रात्री ८ वा.
प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क, फॅनकोड