काकुलो, आसगाव महाविद्यालयाची विजयी सलामी

गोवा विद्यापीठ फुटबॉल स्पर्धा : बोरी, फर्मागुडी, हरमल, बांबोळी संघांचा पराभव

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th September, 12:18 am
काकुलो, आसगाव महाविद्यालयाची विजयी सलामी

पणजी : गोवा विद्यापीठाच्या पुरुष गटातील आंतर महाविद्यालयीन फुटबॉल चॅम्पियनशिप २०२५-२६ च्या चौथ्या दिवशी अत्यंत चुरशीचे सामने झाले. २४ सप्टेंबर रोजी दोन वेगवेगळ्या मैदानांवर झालेल्या या सामन्यांमध्ये अनेक संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली.


गोवा विद्यापीठ मैदान, तळगाव येथे झालेल्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात एस. व्ही. श्रीदोरा काकुलो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टडीज, म्हापसा संघाने स्वामी विवेकानंद विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ कॉमर्स, बोरी संघावर ४-० अशा गोल फरकाने दणदणीत विजय मिळवला. काकुलो  कॉलेजसाठी प्रथमेश सावंतने १२ व्या आणि १६ व्या मिनिटात दोन गोल करत मध्यांतरापर्यंत २-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात वेदांत गाडेकर (५४व्या मि.) आणि आर्यन पोळे (५९व्या मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करत संघाचा विजय निश्चित केला. या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रथमेश सावंत याची निवड करण्यात आली.


दुसऱ्या सामन्यात, गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, बांबोळी संघाने पी.ई.एस. रवी एस. नाईक कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, फर्मागुडीवर टायब्रेकरमध्ये ४-२ असा विजय मिळवला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. टायब्रेकरमध्ये गोवा मेडिकल कॉलेजकडून आयले फर्नांडिस, विश्व केरकर, क्रॉय फर्नांडिस आणि ब्रायसन कोलाको यांनी गोल केले, तर फर्मागुडीच्या संघातून फक्त प्रथमेश नाईक आणि जव्हितो डायस यांनाच गोल करता आले.


रोझरी चर्च मैदान, नावेली येथील पहिल्या सामन्यात अाग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाइन, आसगाव संघाने गणपत पारसेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन, हरमल संघाचा ४-० असा पराभव केला. श्रेयश दाभोळकरने १४व्या आणि १६व्या मिनिटात दोन गोल करत आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात महादेव परवार (४८व्या मि.) आणि कार्तिक गाड (६८व्या मि.) यांनी आणखी दोन गोल नोंदवले. या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून श्रेयश दाभोळकर याची निवड करण्यात आली.


दुसऱ्या सामन्यात, एस.पी.ई.एस. गोवा मल्टी-फॅकल्टी कॉलेज, धारबांदोडाने गोवा डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, बांबोळी संघाचा टायब्रेकरमध्ये ५-२ असा पराभव केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत होते. डेंटल कॉलेजसाठी साहिल आरोलकरने १३व्या मिनिटात, तर मल्टी-फॅकल्टी कॉलेजसाठी आर्यन ठाकूरने ३८व्या मिनिटात गोल केला. टायब्रेकरमध्ये मल्टी-फॅकल्टी कॉलेजकडून झीशान शेख, विजय नाईक, गुरव गावकर, साहिल नाईक आणि दत्ताराम गावकर यांनी गोल केले, तर डेंटल कॉलेजकडून तनय केरकर, मनोज तालकर, गोपाळ मांद्रेकर आणि राज क्वाडर यांनी गोल केले.
आजचे सामने
गोवा विद्यापीठ मैदान, तळगाव :
डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनियरिंग वि. अाग्नेल कॉलेज, पिलार (सकाळी १० वा.)
रोझरी कॉलेज मैदान, नावेली :
गव्हर्नमेंट कॉलेज, खांडोळा वि. डॉन बॉस्को कॉलेज, पणजी (सकाळी ९ वा.)
गव्हर्नमेंट कॉलेज, पेडणे वि. पीईएस कॉलेज ऑफ फार्मसी (सकाळी ११ वा.)