गॅस्पर डायस ओपन टेबल टेनिस : चंदन, इशान, रुहान, अनया, आर्ना यांनीही जिंकले किताब
पणजी : क्लब टेनिस दे गॅस्पर डायस येथे गोवा टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेखाली प्रायोरिटी गॅस्पर डायस ओपन अखिल गोवा मेजर रँकिंग टेबल टेनिस स्पर्धा २०२५ प्रायोरिटी कन्स्ट्रक्शन्स यांच्या सहकार्याने पार पडली. या स्पर्धेत इशिता कुलासो आणि आरोन फरियास यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली. इशिताने १५ वर्षांखालील मुली, १९ वर्षांखालील मुली आणि महिलांच्या सिंगल्समध्ये बाजी मारत दुर्मिळ असा तिहेरी मुकुट पटकावला, तर आरोनने १९वर्षांखालील मुले आणि पुरुष सिंगल्स जिंकून दुहेरी विजेतेपद पटकावले.
अंतिम फेरीत स्पर्धकांची झुंज
११ वर्षांखालील मुलांमध्ये इशान कुलासोने अशांक दळवीला ३-१ ने हरवले. ११ वर्षांखालील मुलींच्या गटात अनया शुक्लाने आर्ना लोटलीकरवर ३-० असा विजय मिळवला. १३ वर्षांखालील मुलांमध्ये रुहान शेखने युग प्रभूला चुरशीच्या सामन्यात ३-२ ने पराभूत केले. १३ वर्षांखालील मुलींच्या सामन्यात आर्ना लोटलीकरने साची देसाईवर ३-२ अशी नजाकतीने मात केली.
१५ वर्षांखालील मुलांच्या गटात चंदन कारोने रुहानला ३-१ ने पराभूत करून विजेतेपद पटकावले. मात्र, १९ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात त्याला आरोन फरियासकडून २-३ ने पराभव पत्करावा लागला. महिलांच्या अंतिम सामन्यात इशिता कुलासोने उर्वी सुुर्लकरवर ३-१ ने विजय मिळवत आपल्या तिहेरी मुकुटावर शिक्कामोर्तब केले. पुरुष गटात आरोनने धीराज राय याच्याविरुद्ध ४-३ अशी निसटती आघाडी घेत विजेतेपद आपल्या नावे केले.
अंतिम सामन्याच्या वेळी प्रायोरिटी कन्स्ट्रक्शन्सचे व्यवस्थापकीय संचालक परिंद नाचणोलकर, जीटीटीएचे सचिव ख्रिस्तोफर मिनेझिस, शताब्दी उत्सव समितीचे अध्यक्ष संजीव सरदेसाई, क्लब टेनिस द गॅस्पर डायसचे सचिव तनमय खोलकर आणि जीटीटीएचे उपाध्यक्ष एडविन मिनेझिस उपस्थित होते.
ज्येष्ठांच्या गटातही खेळाडूंचा प्रभावी खेळ
४०+ गटात संदीप डिमेलो, ५०+ गटात कल्याणारामन बी आणि ६०+ मध्ये जोसेफ सेकेरा यांनी विजेतेपद पटकावले. अनुक्रमे जिझस डिकोस्टा (४०+), रत्नदीप शिवाणी (५०+) आणि दिनेश शेट्टी (६०+) हे उपविजेते ठरले.