बांगलादेशचा ४१ धावांनी धुव्वा : अभिषेक शर्माचा दबदबा कायम
दुबई : टीम इंडियाने टी-२० आशिया कप २०२५ स्पर्धेतील सुपर ४ फेरीतील एकूण चौथ्या सामन्यात बांगलादेशवर मात केली आहे. टीम इंडियाने बांगलादेशवर ४१ धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने बांगलादेशसमोर १६८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला १९.३ षटकांमध्ये १२७ धावांवर ऑलआऊट केले. टीम इंडियाने यासह या स्पर्धेत सलग पाचवा विजय मिळवला. तसेच टीम इंडियाने या विजयासह अंतिम फेरीतही धडक दिली आहे.
तत्पूर्वी, बांगलादेशने सुपर ४ मधील चौथ्या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडले. अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने भारताला चाबूक सुरुवात करून दिली. या दोघांनी जोरदार फटकेबाजी केली. मात्र, शुबमनच्या तुलनेत अभिषेकने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी पावरप्लेचा पूर्ण फायदा घेतला. मात्र सातव्या षटकामधील दुसऱ्याच चेंडूवर बांगलादेशने डोकेदुखी ठरत असलेली ही सेट जोडी फोडली. शुबमन गिल १९ चेंडूमध्ये २९ धावा करून बाद झाला.
बांगलादेशने त्यानंतर नवव्या षटकामधील पहिल्याच चेंडूवर भारताला दुसरा झटका दिला. शिवम दुबे २ धावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेकने कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्यासह तिसऱ्या विकेटसाठी २९ धावा जोडल्या. या जोडीला मोठी भागदारी करण्याची संधी होती. मात्र भारताने तिसरी विकेट गमावली. बांगलादेशने कडक फिल्डिंगच्या जोरावर अभिषेक शर्मा याला धावबाद केला. अभिषेकने भारतासाठी सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ३७ चेंडूमध्ये ५ षटकार आणि ६ चौकारांसह ७५ धावा केल्या.
बांगलादेशने अभिषेकनंतर टीम इंडियाला ठराविक अंतराने २ झटके दिले. कर्णधार सूर्यकुमार यादव पाकिस्ताननंतर या सामन्यातही अपयशी ठरला. सूर्या ५ धावांवर झेलबाद झाला. तर तिलक वर्मा फटकेबाजीच्या प्रयत्नात झेलबाद झाला. तिलकने सूर्याप्रमाणे ५ धावा केल्या.
त्यानंतर अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३९ धावांची भागिदारी केली. त्यानंतर हार्दिक ३८ धावा करून माघारी परतला. हार्दिक बाद होताच २० षटकांचा खेळ आटोपला. बांगलादेशने अशाप्रकारे टीम इंडियाला ठराविक अंतराने एकूण ६ झटके देत १६८ धावांवर रोखले. बांगलादेशसाठी रिशाद हौसेनने सर्वाधिक २ गडी बाद केले. तर तंझिम साकिब, मुस्तफिजुर आणि सैफुद्दीन या तिघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.
भारत पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा काढणारा संघ
आशिया कप २०२५ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्धकांना अक्षरशः हादरवून सोडले आहे. विशेषतः पॉवरप्लेमध्ये भारताने केलेली कामगिरी कमालीची आहे. या स्पर्धेत भारताने पॉवरप्लेमध्ये प्रति षटक ११.२९ च्या सरासरीने धावा केल्या आहेत, जे इतर संघांपेक्षा खूप जास्त आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेची सरासरी ८.३० असून, बांगलादेशची सरासरी ८.२९ आहे.
भारताची पॉवरप्लेतील कामगिरी
युएई वि. : ६०/१ (४.३ षटके)
पाकिस्तान वि. : ६१/२
ओमान वि. : ६०/१
पाकिस्तान वि. : ६९/०
बांगलादेश वि. : ७२/०
पॉवरप्लेमध्ये अभिषेकचा दबदबा
आशिया कप २०२५ मध्ये अभिषेक शर्माने पॉवरप्लेतील १२ षटकारांचा विक्रम केला, जो श्रीलंकेच्या संपूर्ण संघाच्या सारखाच आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशने प्रत्येकी ७ षटकार मारले, तर अफगाणिस्तान, यूएई आणि ओमानने २-२ षटकार केले. हाँगकाँगने केवळ एकच षटकार मारला. अभिषेकची ही आक्रमक खेळी भारतीय संघाला मजबूत पाया देणारा ठरली.
टी-२० सामन्यांत भारतासाठी जलद अर्धशतक
टी-२० क्रिकेटमधील जलद फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या फलंदाजांमध्ये भारताच्या काही प्रमुख खेळाडूंची नावे आघाडीवर आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत अर्धशतक पूर्ण करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी आहे. त्याने सर्वाधिक ७ वेळा ही कामगिरी केली आहे. त्याच्या खालोखाल भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ६ अर्धशतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतीय फलंदाज
सूर्यकुमार यादव - ७ वेळा
रोहित शर्मा - ६ वेळा
अभिषेक शर्मा - ५ वेळा
युवराज सिंग - ४ वेळा
केएल राहुल - ३ वेळा
............
टी-२० मध्ये बांगलादेशकडून सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
मुस्तफिझुर रहमान : १५० बळी
शाकिब अल हसन : १४९ बळी
टस्किन अहमद : ९९ बळी
मेहदी हसन : ६१ बळी
शोरिफुल इस्लाम : ५८ बळी