अभिषेक शर्माची अर्धशतकी खेळी : पाकचा ६ विकेट्सने पराभव
दुबई : आशिया कप २०२५ मधील पहिल्या सुपर-४ सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा याच्या अर्धशतकी (७४ धावा) खेळीनंतर तिलक वर्माच्या १९ चेंडूंतील ३० धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीने भारताला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने भारताला विजयासाठी १७२ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर सहज पूर्ण केले.
१७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या अभिषेक शर्माने धमाकेदार अर्धशतक झळकावून विजयाचा पाया रचला. त्यानंतर तिलक वर्माने केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने हे लक्ष्य सहज गाठले आणि पाकिस्तानवर ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने सुपर-४ मध्ये आपली विजयी सुरुवात केली आहे.
तत्पूर्वी, आशिया कप २०२५ स्पर्धेत सुपर ४ फेरीतील दुसऱ्या आणि एकूण १४ व्या सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियासमोर प्रथम फलंदाजी करताना १७२ धावांचे आव्हान ठेवले. पाकिस्तानने २० षटकांत ५ विकेट्स गमावून १७१ धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. अभिषेक शर्मा, कुलदीप यादव आणि शुबमन गिल या तिघांनी झेल सोडले. पाकिस्तानने या संधीचा फायदा घेत १७१ धावा केल्या.
भारताने पहिल्याच षटकात साहिबजादा फरहानला जीवनदान दिले. हार्दिक पंड्याने सामन्यातील तिसऱ्याच चेंडूवर साहिबजादा फरहानला जाळ्यात अडकवले होते. मात्र, अभिषेक शर्माने सोपा झेल सोडला. त्यामुळे साहिबजादाला शून्यवर असताना जीवनदान मिळाले. या जीवनदानाचा साहिबजादाने चांगलाच फायदा घेतला. त्यानंतरही अभिषेकने पुन्हा आठव्या षटकामधील तिसर्या चेंडूवर साहिबजादाला जीवनदान दिले. अभिषेक सीमारेषेजवळ असता तर झेल घेता आला असती. मात्र अभिषेक थोडा पुढे होता. त्यामुळे साहिबजादाला पुन्हा जीवनदान मिळाले. याचा फायदा घेत साहिबजादाने साहिबजादाने ४५ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांसह ५८ धावा केल्या. अभिषेक व्यतिरिक्त कुलदीप यादवने सॅम अयुब तर शुबमन गिलने फहीम अश्रफ याला जीवनदान दिले. मात्र त्यानंतरही भारताने जोरदार कमबॅक केले आणि पाकिस्तानला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.
पाकिस्तानसाठी मोहम्मद नवाझ आणि सॅम अयुब या दोघांनी प्रत्येकी २१-२१ धावा केल्या. फहीम अश्रफ याने नाबाद २० धावा जोडल्या. कॅप्टन सलमान आगाने नाबाद १७ धावा केल्या. फखर झमानने १५, तर हुसनैन तलटने १० धावा जोडल्या. टीम इंडियासाठी शिवम दुबेने २ विकेट्स मिळवल्या, तर कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.
बुमराहचा लाजिरवाणा विक्रम
ओमान संघाविरुद्ध विश्रांतीनंतर जसप्रित बुमराहने त्याच्या पुनरागमन सामन्यात एक लाजिरवाणा विक्रम रचला. या सामन्यात बुमराहने ४ षटकांत ४५ धावा दिल्या. टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध बुमराहच्या संपूर्ण कारकिर्दीतील हा सर्वात महागडा पॉवरप्ले स्पेल ठरला. याआधी कधीच त्याने एका स्पेलमध्ये ४० पेक्षा जास्त धावा दिल्या नव्हत्या. बुमराह पाकिस्तानविरुद्ध निष्प्रभ ठरला, ज्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीवर सहज धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : २० षटकांत ५ बाद १७१ धावा.
भारत : १८.५ षटकांत ४ बाद १७४ धावा.
सामनावीर : अभिषेक शर्मा