योजनेचा सरकारला मोठा तोटा झाल्याचा दावा
पणजी : राज्य सरकारने जाहीर केलेली १६ घन मीटर मोफत पाणी योजना आता पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने याबाबत अधिसूचना जारी केली असून, १ सप्टेंबर पासून सर्व ग्राहकांना त्यांच्या मासिक वापरानुसार पाण्याचे शुल्क भरावे लागणार आहेत. या निर्णयामुळे आता गोमंतकीयांना पाणी वापरासाठी पैसे मोजावे लागतील.
या नव्या नियमानुसार, ग्राहकांना पाणी वापरासोबतच मीटरचे भाडेही द्यावे लागणार आहे. त्यासाठी ग्राहकांकडे चालू स्थितीत असलेले पाणी मीटर असणे बंधनकारक आहे. दोन किंवा त्याहून अधिक घरांसाठी संयुक्त पाणी जोडणी असेल, तरीही त्यांना वापरानुसार किंवा किमान मागणीनुसार शुल्क आकारले जाईल. इतर सर्व श्रेणीतील ग्राहकांसाठीही हाच नियम लागू असणार आहे.
गोवा सरकारने सप्टेंबर २०२१ मध्ये १६ घन मीटर मोफत पाणी योजना सुरू केली होती. परंतु, मे २०२५ मध्ये ही योजना बंद करण्यात आली. या योजनेदरम्यान सरकारला मोठा आर्थिक फटका बसल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेवर सुमारे ६५ कोटी रुपयांचा खर्च झाला होता आणि या कालावधीत शून्य मूल्याची ४१.९ लाख पाण्याची बिले वाटली गेली होती.
या योजनेमुळे सरकारला प्रति लिटर १६ रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. कारण, पाणी शुद्ध करण्यासाठी सरकारला प्रति लिटर २० रुपये खर्च येत होता, तर ते पाणी ४ रुपये प्रति लिटर दराने पुरवले जात होते. याशिवाय, काही लाभार्थ्यांनी या योजनेचा गैरवापर केल्याचेही उघड झाले. या सर्व कारणांमुळे सरकारने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.