दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर

अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर : गोवा सरकारचा दिव्यांगांना मदतीचा हात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th September, 11:30 pm
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर

पणजी : दिव्यांग सक्षमीकरण खात्याने पहिली ते पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या ४० टक्के किंवा अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. यामध्ये विद्यार्थ्याला त्याचा इयत्तेनुसार ११ महिन्यांसाठी मासिक २,२०० ते ९,९०० रुपये दिले जातील. यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १.५० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने आधीच्या इयत्तेत किमान ४५ टक्के गुण मिळवले असणे गरजेचे आहे.
बीए, बीकॉम, बीएससी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक ६५० रु., वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २७० रु. तर नेत्रहिन विद्यार्थ्यांना मासिक ११५ रुपये भत्ता देण्यात येणार आहे. बीई, बीआर्च, एमबीबीएस, एलएलबी, बीएड, पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ९०० रुपये मासिक शिष्यवृत्ती देण्यात येईल. शिवाय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३६० रुपये व नेत्रहिन विद्यार्थ्यांना मासिक १५० रुपये भत्ता देण्यात येणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून संगीत किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थी देखील या शिष्यवृत्तीसाठी पात्र असणार आहेत.
इच्छुकांनी सीएम शिष्यवृत्ती पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व अर्ज केवळ ऑनलाइन प्रक्रियाद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर आहे. अधिक माहिती खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्याकडे वैद्यकीय मंडळाने दिलेले दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
विविध स्तरांवरील विद्यार्थ्यांना मिळणारी मदत
- पहिली ते आठवी : दरमहा २०० रुपये
- नववी ते बारावी : दरमहा ३०० रुपये
- नववी ते बारावी (वसतिगृहात न राहणाऱ्यांसाठी) : दरमहा ५०० रुपये
- नववी ते बारावी (वसतिगृहात राहणाऱ्यांसाठी): दरमहा २०० रुपये
- नेत्रहिन विद्यार्थ्यांना दरमहा ७५ रुपये भत्ता देण्यात येणार आहे.             

हेही वाचा