तेव्हा रेल्वे रुळ दुपदरीकरणाची फाईल मी नाकारली होती मात्र आता.. : जुजे फिलिप डिसोझा

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
04th September, 04:03 pm
तेव्हा रेल्वे रुळ दुपदरीकरणाची फाईल मी नाकारली होती मात्र आता.. : जुजे फिलिप डिसोझा

पणजी : रेल्वे रुळ दुपदरीकरणाची फाईल मी मंत्री असताना नाकारली होती. मात्र याला परवानगी देणारे दिगंबर कामत आणि सुदिन ढवळीकर आज भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जोस फिलिप डिसोझा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

ढवळीकर यांनी काँग्रेस सरकारने रेल्वे रुळ दुपदरीकरणास परवानगी दिल्याचे सांगितले; पण २००७ ते २०१२ या काळात ते स्वतः त्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते, हे त्यांनी विसरू नये असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना डिसोझा म्हणाले. मी त्या काळात बंदरकामशिपिंग मंत्री होतो. कोळसा घेऊन आलेली दोन मोठी जहाजे आणि राज्याच्या सीमेवर आलेले ट्रक मी परत पाठवले होते, असे ते म्हणाले.

भाजप नेते मनोहर पर्रीकर यांनीही रेल्वे दुपदरीकरणाला विरोध केला होता. मात्र आता त्यांचेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्याला कोळसा हब करण्याचा प्रयत्न करत आहेत, डिसोझा यांनी पुढे सांगितले. लोकांना नको असलेले प्रकल्प तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी युती सरकारने नाकारले होते. त्यावेळी वास्कोमुरगावचे आमदारही दुपदरीकरणाच्या विरोधात होते, ते आता कुठे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जिल्हा परिषद, विधानसभा आणि आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) इतर समविचारी पक्षांसोबत युतीस तयार आहे. मात्र, काँग्रेसवर विश्वास ठेवता येत नाही. ते केवळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी युतीचा विचार करतात. स्थानिक पक्षांसोबत आमची चर्चा सुरू आहे. मतदारसंघात जास्त उमेदवार उभे राहिल्यास मतांची विभागणी होऊन भाजपाला फायदा होतो. त्यामुळे जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच पाठींबा द्यायला हवा असे ते म्हणाले.

मी मतदारसंघ बदलून चूक केली होती. मात्र आता ती चूक पुन्हा होणार नाही. २०२७ मध्ये मी वास्को येथूनच निवडणूक लढवणार आहे, असे आपल्या राजकीय भवितव्याबाबत बोलताना डिसोझा म्हणाले. 

हेही वाचा