जीएसटी स्लॅबमधील सुधारणा अर्थव्यवस्थेसह समाजासाठीही ठरतील लाभदायी!

गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीकडून जीएसटीतील नव्या सुधारणांचे स्वागत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
04th September, 03:38 pm
जीएसटी स्लॅबमधील सुधारणा अर्थव्यवस्थेसह समाजासाठीही ठरतील लाभदायी!

पणजी : जीएसटीचे नवे दरसुधारणा या केवळ व्यवसायग्राहकांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठीही लाभदायी ठरणार असल्याचे मत गोवा चेंबरच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड यांनी व्यक्त केले आहे. विमा आणि आरोग्य सेवांवरील जीएसटी परवडण्याजोगा केल्याने त्यांची मागणी वाढेल. त्याचबरोबर या सुधारणा आर्थिक वाढीला चालना देत देशाची सामाजिक आणि आर्थिक घडी मजबूत करण्यास मदत करतील, असेही त्यांनी नमूद केले.

गोवा चेंबरच्या मते, दरकपातीमुळे देशाच्या जीडीपी वाढीला चालना मिळेल आणि राष्ट्रीय विकासदरात सुमारे ०.५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या हातात खर्च करण्यायोग्य उत्पन्न वाढल्याने ऑटोमोबाईल्स, ग्राहकोपयोगी वस्तू, कपडे आणि इतर उत्पादनांची मागणी वाढेल. यामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही मोठा फायदा होईल. जीएसटी सुधारणांमुळे सामाजिक-आर्थिक क्षेत्रातही सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. जीवन व आरोग्य विमा पॉलिसींवरील जीएसटी रद्द झाल्याने विमा परवडणारा होईल आणि अधिकाधिक लोक या सुरक्षेच्या जाळ्यात सामील होतील. त्याचबरोबर ३३ जीवनावश्यक औषधांवरील जीएसटी सूट, इतर औषधांवरील दरकपात तसेच वैद्यकीय उपकरणांवरील कमी दर आरोग्यसेवा अधिक किफायतशीर करतील.

शेतकरी, कारागीर आणि कामगारांनाही या सुधारणांचा लाभ होणार आहे. ट्रॅक्टर, कृषी उपकरणे, हस्तकला, संगमरवरी वस्तू, चामड्याच्या वस्तू आणि कापडांवरील जीएसटी कमी झाल्याने या क्षेत्रातील उत्पादन व रोजगारास चालना मिळेल. सामान्य नागरिकांसाठीही ही मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे. केसांचे तेल, साबण, शाम्पू, टूथपेस्ट, सायकली, घरगुती वस्तू, नमकीन, नूडल्स, चहा, कॉफी, दुधाचे पदार्थ आणि भारतीय ब्रेड यांसारख्या दैनंदिन वापरातील वस्तूंना ५ टक्के किंवा शून्य कर श्रेणीत आणण्यात आल्याने कुटुंबांना थेट फायदा होईल.

दरकपातीमुळे घरगुती उपकरणे, वस्त्र आणि महत्त्वाकांक्षी उत्पादनांच्या मागणीत वाढ अपेक्षित आहे. तसेच ऑटोमोबाईल्स, एअर कंडिशनर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्रीही वाढेल. परिणामी, अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल आणि अमेरिकेच्या टॅरिफच्या प्रतिकूल परिणामांपासून देशांतर्गत बाजारपेठेचे संरक्षण होईल, असे गोवा चेंबरने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा