गोव्यात सहकारी तत्त्वावर टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत विचार सुरू : आशुतोष आपटे

सहकारी तत्त्वावर मिठागरे चालवण्याबाबत विचार सुरू

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
04th September, 02:25 pm
गोव्यात सहकारी तत्त्वावर टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत विचार सुरू : आशुतोष आपटे

पणजी : केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी सहकारी टॅक्सीची घोषणा केली होती. याच धर्तीवर गोव्यात सहकारी तत्त्वावर टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सहकार प्रबंधक आशुतोष आपटे यांनी सांगितले. गुरुवारी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (जीसीसीआय) तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नाबार्डचे संदीप धारकर, जीसीसीआयच्या अध्यक्षा प्रतिमा धोंड, आरबीआयचे प्रादेशिक संचालक प्रभाकर झा आणि पीएचडी सीसीआयचे डॉ. जतींदर सिंग उपस्थित होते.

आपटे म्हणाले की, केंद्रीय सहकार खात्याने विविध ५४ क्षेत्रांमध्ये सहकारी संस्था वाढवण्याची शक्यता तपासण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आम्ही गोव्यात पर्यटन क्षेत्रात सहकार वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. याच अनुषंगाने सहकारी तत्त्वावर टॅक्सी सेवा सुरू करता येईल का, याचाही विचार सुरू आहे. याबाबत आम्ही अधिक अभ्यास करून शक्यता असल्यास पुढील पावले उचलणार आहोत. अशा उपक्रमाला गरज असेल तर नाबार्ड तसेच खात्यांतर्फे आर्थिक मदत दिली जाईल. सहकारी टॅक्सी सुरू झाल्यास त्याचा फायदा स्थानिकांसह पर्यटकांनाही होऊ शकतो.

ते म्हणाले, राज्यात सुमारे ५५०० सहकारी संस्थांची नोंदणी आहे. अपवाद वगळता बहुतेक संस्था एकाच प्रकारचा व्यवसाय करतात. या संस्थांना एकाहून अधिक व्यवसाय करण्याची परवानगी मिळावी यासाठी खात्यांतर्फे प्रयत्न सुरू आहेत. आयटी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सहकार क्षेत्राला बळकटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यात सहकार क्षेत्र वाढीसाठी वाव आहे. केंद्रीय सहकारी विद्यापीठाचे गोवा कॅम्पस सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल. डिसेंबर २०२५ अखेरीस प्रत्येक पंचायत क्षेत्रात किमान एक सहकारी संस्था स्थापन करण्याचे खात्याचे लक्ष्य आहे.

मिठागरांच्या पुनरुज्जीवनासाठीही प्रयत्न

आपटे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत गोव्यातील मिठागरांची संख्या कमी होत आहे. आम्ही खात्यांतर्फे मिठागरांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करणार आहोत. सहकारी तत्त्वावर मिठागरे चालवण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. फार्मा कंपन्यांना लागणाऱ्या औषधी वनस्पतींचे उत्पादन वाढवण्याबाबतही प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा