पोलीस घटनास्थळी दाखल; तपास सुरू
पणजी : सांकवाळ-झुआरीनगर येथे असलेली गोव्यातील नामांकित तंत्र शिक्षण संस्था बिट्स पिलानीचा के. के. बिर्ला कॅम्पस पुन्हा एकदा आत्महत्येच्या धक्कादायक घटनेने हादरला आहे. येथे शिकणाऱ्या २० वर्षीय ऋषी नायर या विद्यार्थ्याने ४ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. गेल्या दहा महिन्यांत सलग पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने संस्थेच्या प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा तपास सुरू आहे.
याआधी १६ ऑगस्ट रोजी लखनौचा रहिवासी असलेला तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी कुशाग्र जैन आपल्या वसतिगृहात मृतावस्थेत आढळला होता. अभ्यासाचा ताण, मानसिक तणाव अथवा इतर कोणते कारण यामागे आहे का, याचा तपास सुरू असतानाच आणखी एका विद्यार्थ्याने जीवन संपवल्याने बिट्स पिलानीतील घडामोडींवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. डिसेंबर २०२४ पासून सुरू झालेल्या या मालिकेत सर्वप्रथम उत्तर प्रदेशातील ओम प्रियान सिंग या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये अथर्व देसाई, तर मे २०२५ मध्ये २० वर्षीय कृष्णा केसरा हा विद्यार्थी मृतावस्थेत सापडला. यानंतर ऑगस्टमध्ये कुशाग्र जैन, आणि आता सप्टेंबरमध्ये ऋषी नायर या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी बिट्स पिलानी कॅम्पसवर काळी छाया पसरल्याचे चित्र आहे.
तणावाखाली आत्महत्या केल्याची शक्यता
ऋषी हा गेल्या महिन्यातच या कॅम्पसमध्ये आला होता. यापूर्वी तो हैद्राबाद येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये होता. तेथे वैयक्तिक कारणास्तव नैराश्यात गेल्याने तो तणावाखाली वावरत होता. त्यामुळे त्याला तेथून गोवा कॅम्पसमध्ये प्रवेश देण्यात आला. तथापी येथेही तो तणावाखाली वावरत असल्याची माहिती समोर आली आहे. या मानसिक तणावाखालीच त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तत्कालीन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी या मृत्यूंवर शोक व्यक्त करून संस्थेला कारणे व प्रतिबंधात्मक उपायांवर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मे २०२५ मध्ये बिट्स पिलानीने अहवाल सादर केला असला तरी, तो अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. बिट्स पिलानी या नावाजलेल्या शिक्षण संस्थेत देश आणि विदेशांतूनही हजारोंच्या संख्येने विद्यार्थी अनेक तांत्रिक शाखांत शिक्षण घेतात. मागील दहा महिन्यांत घडलेल्या घटनांनी या शैक्षणिक संस्थेची प्रतिमा डागाळली गेली आहे. अभ्यासाचा तणाव, रॅगींग किंवा इतर कारणांमुळे या घटना वारंवार उद्भवत असतील तर त्या गोष्टींचा मागोवा काढण्यातही तपास यंत्रणा आणि शिक्षण संस्थेच्या प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.
कुशाग्र जैन याच्या आत्महत्येनंतर बिट्समध्ये प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून आवश्यक त्या उपाय योजना राबवण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आल्याचे सांगितले होते. पण आज घडलेल्या घटनेने या सर्व बाबी फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही प्रचंड भीतीचे वातावरण आहे. संस्थेची प्रतिष्ठा डागाळली असून प्रशासनावर चौफेर दबाव वाढला आहे. पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून आत्महत्येचे कारण शोधण्यास सुरुवात केली असून तपास सुरू आहे.